भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता नियोजित पध्दतीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे. त्याकरिता अशा क्षेत्रात मदत केंद्र सुरू करून योग्य प्रकारे संचालन केल्यास अधिक प्रभावी मदत करता येईल. हा दृष्टिकोन समोर ठेवून येथे भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्हा दुष्काळ निवारण केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री प्रफुल्ल पारख यांच्या हस्ते झाले.
वर्धमान अर्बन क्रेडिट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र जैन यांनी संस्थेतर्फे व स्वत: एक महिना एक टॅंकर योजनेसाठी मदत जाहीर केली. सोबतच शहर अध्यक्ष मयुर छाजेड, हीना जैन, राजेंद्र छाजेड, प्रेमचंद मुथा यांनी टॅंकर योजनेत व मेहकर येथील जयचंद बाठिया या महेश पारख यांनी ११ गाडी कडबा या योजनेत दान घोषित केले.
जैन समाजातील नागरिकांनी या कार्यात तनमनधन अर्पण करण्याचे आवाहन प्रफुल्ल पारख यांनी केले. संघटनेचे मुख्य कार्यालय संपूर्ण भारतातून व राज्यातून संकलित करून बुलढाणा जिल्ह्य़ातील आवश्यक भागात ते पोहोचविण्याचे कार्य करेल, असे आश्वासन दिले.
 महिला संघटनेच्यावतीने शहरातील तिसरी पाणपोई जिजामाता महाविद्यालयात सुरू करण्यात आली.
गेल्या २५ वर्षांतील विशेषत: मराठवाडा व बुलढाणा जिल्ह्य़ात निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतिलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जैन समाज आणि इतर संस्थांच्या माध्यमाने गरजूंना ठोस मदत पोहोचविण्याचा निर्णय २६ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या राज्यव्यापी परिषदेत घेण्यात आला. या अगोदर लातूर, गुजरात, जबलपूर, काश्मीर येथे भूकंपात व अंदमान, गोवा, येथे त्सुनामीच्या प्रसंगी भारतीय जैन संघटनेने विशेष मदत कार्य केले आहे.
आजवर संघटनेने अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी महाराष्ट्रातून जाऊन दूर मोठे कार्य केले आहे. यावर्षी भीषण दुष्काळ आपल्या घरातच आल्याने सर्व कार्यकर्त्यांनी या कामात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन मुथा यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर, अकोला, मलकापूर, लोणार, मेहकर, नाशिक येथून संघटनेचे पदाधिकारी आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देशलहरा यांनी केले. गौतम बेगानी, मयुर छाजेड, पराग संचेती, अ‍ॅड. धीरज गोठी, तुषार कोठारी, संतोष मालू, संदीप संचेती, शिल्पा बुरड, सुषमा राखेछा, वंदना छाजेड, यांच्यासह इतर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा