भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इत्थंभूत इतिहासाची नोंद असणारा ‘इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स-व्ह्य़ुज्युअल्स अँण्ड डॉक्यूमेंटस्’हा मौल्यवान ग्रंथ ठाण्यातील इतिहासतज्ज्ञ डॉ. अरुण जोशी यांनी कोकण इतिहास परिषदेच्या संकल्पित ग्रंथालयास देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या भावी पिढीला स्वातंत्र्यलढय़ाची ओळख होण्यासाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे.  
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९८५ मध्ये ‘एनसीईआरटी’ने हा ग्रंथ संपादित केला. या ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात परकीय वसाहतकारांच्या भारतीय उपखंडातील आगमनापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांची तपशीलवार नोंद आहे. जी.एल. अध्याय या ग्रंथाचे मुख्य संपादक होते. ठाणेकरांसाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे संपादकीय मंडळामध्ये डॉ. अरुण जोशी हे एकमेव महाराष्ट्रीय होते. त्यांनी या ग्रंथातील महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. या ग्रंथात एकमेकांसमोरील पानांवर अनुक्रमे विशिष्ट घटनेविषयीचे दस्तऐवज आणि दुर्मीळ छायाचित्रे आहेत.
१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्यातील जहाल आणि मवाळ गट, बंगालची फाळणी, पहिले महायुद्ध, महात्मा गांधींचा राजकीय चळवळीत प्रवेश, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत आणि असहकार चळवळ, दांडीयात्रा, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, मिठाचा सत्याग्रह, गोलमेज परिषद, १९४२ ची चलेजाव चळवळ, नाविकांचे बंड, कामगारांचे देशव्यापी आंदोलन, भारताची फाळणी, संस्थानिकांचे विलीनीकरण आदी महत्त्वाच्या घटनांची सचित्र माहिती या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या योगदानाची या ग्रंथात स्वतंत्रपणे नोंद घेण्यात आलेली आहे. याशिवाय देशभरातील प्रादेशिक भाषांमधील क्रांतिगीतांचे इंग्रजी अनुवादही या ग्रंथात आहेत. डॉ. अरुण जोशी यांनी मराठीतील कवी कुंजविहारी यांचे ‘तयाला तुरुंग भिववील किती?’ आणि कुसुमाग्रजांचे ‘क्रांतीचा जयजयकार’ ही दोन गीते इंग्रजीत अनुवादित केली आहेत. संपादकीय मंडळाचे सदस्य आणि लेखक म्हणून या ग्रंथाची प्रत डॉ. अरुण जोशींच्या संग्रहात आहे. २८ वर्षांपूर्वी या ग्रंथाच्या दहा हजार प्रती छापण्यात आल्या होत्या आणि त्यावेळी सवलतीत ६५० रुपये किंमत होती. सध्या हा अमूल्य ग्रंथ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. मात्र प्रत्येक शाळेत तो असायला हवा, असे डॉ. अरुण जोशी यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या संग्रहातील हा ठेवा इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध करून दिला आहे. इतिहासाचे शिक्षक तसेच प्राध्यापकांनी संदर्भासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.