साक्री तालुक्यातील निजामपूर येथे इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करून राहणाऱ्यांना ग्रामपंचायतीने अखेर पोलीस बंदोबस्तात कारवाई करून हुसकून लावले. त्यानंतर रिक्त झालेली ही घरकुले शासनाकडून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांनाही हायसे वाटले. निजामपूर येथे इंदिरानगर येथे २०१०-११ मध्ये मंजूर झालेल्या ८ घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती काही जणांनी बळकावली होती. या घुसखोरीमुळे मूळ लाभार्थी डावलले गेले अन् त्या घरात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढणे एक समस्या बनली. ग्रामपंचायतीने तोंडी, नंतर लेखी नोटिसा बजावल्या, पण घुसखोर जुमानत नव्हते. ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर ही घरकुल खाली करण्याची धडक मोहीम सुरू झाली. साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. एन. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी एस. के. पवार, उपसरपंच ताहीरबेग मिर्झा यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. एका घराची किंमत ६८ हजार रुपये आहे.