शहरातील वाहनांची संख्या जशी वाढली, तसे अपघातांचे प्रमाणही दरदिवशी वाढते आहे. कुठलीही शिस्त नसलेली वाहतूक आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांचे अपयश हे मुद्दे जसे त्यासाठी जबाबदार आहेत, तसेच वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवणारे वाहनचालक हेही तितकेच जबाबदार आहेत.
वैशालीनगरात सोमवारी रात्री वेगात दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन त्यात तिघांना प्राण गमवावे लागले. रात्री रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याचे पाहून दोन्ही दुचाकीस्वार वेगात जात होते. दोन दुचाकींवर बसलेले तिघाजणांचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्यांचा मृत्यू झाला. वाहने वेगात चालवू नका, हेल्मेट घाला असे वारंवार सांगितले जाते. वाहतूक नियमही हेच सांगतात. तरीही तरुणाईचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील कोणत्याही भागातील कोणताही रस्ता असो, वाहने विशेषत: दुचाकी वेगात जात असल्याचे प्रत्येक ठिकाणी दिसते. वास्तविक शहर विस्तारत आहे. शहरातील कुठल्याही रस्त्याने जा, त्या रस्त्याला जोडणाऱ्या गल्ल्यांची संख्याही मोठी आहे. केव्हा कुठले वाहन आडवे येईल, याचा काहीच भरवसा नसतो.
सुमारे २५-३० वर्षांपूर्वी शहरात वाहनांची संख्या कमी असल्याने वाहतूक बरीच सुरळीत होती. परंतु विशेषत: नागपुरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावी नसल्यामुळे खाजगी वाहनांची संख्या वाढत गेली. आज नागपूरच्या रस्त्यावर लहानमोठी सर्व प्रकारची मिळून सुमारे २० लाख स्वयंचलित वाहने धावत आहेत. हे सर्व वाहनचालक नियम पाळून वाहने चालवत असते तर प्रश्न नव्हता, पण हे नियम सर्रास मोडले जातात. वाहतुकीचे नियम मोडण्यातच मर्दुमकी वाटणाऱ्या युवकांची संख्या मोठी आहे. ते ज्या वेगाने वाहने हाकतात, ते पाहून रस्त्यावरील इतरांच्या मनात धडकी भरते. रस्त्याने सरळमार्गी जाणाऱ्यासही जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
शहरात १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर दरम्यान एकूण ८८७ अपघात घडले. त्यात २२० जणांना प्राण गमवावे लागले. ३०८ गंभीर जखमी झाले. प्राण गमवावे लागणाऱ्या २२० जणांमध्ये ७४ मोटारसायकल तर १९ इतर दुचाकी चालक होते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी
दिली.
अपघातात ठार होण्यामागे हेल्मेट न वापरणे हे कारण असल्याचे उघड झाले आहे. अनेक अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे व त्यानेच मृत्यू ओढवल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर उपयुक्त असल्याचे पोलीस वारंवार सांगतात. तरीही त्याकडे वाहन चालक कानाडोळा करतात.
वाहन वेगे वेगे दामटणे सोडून सावकाश चालवा. वेळीच नियंत्रण मिळवता येईल, अशीच वाहने चालवल्यास सर्वाचेच भले होईल, असे वाहतूक नियम सांगतात.    

Story img Loader