इंडसइंड बँकेच्या २८ लाख रूपये चोरीच्या प्रकरणात आज आणखी तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ लाख ३० हजार २१० रूपयेही हस्तगत करण्यात आले. यापूर्वी पकडलेले बँकेचेच ३ कर्मचारी व यांचा काही संबंध आहे का याच्या शोधात पोलीस आहेत.
सद्दाम शेख इक्बाल (राहणार कोठला), इरफान शेख जाकीर (लालटाकी), चांद सलीम सय्यद (सर्जेपुरा) अशी आज अटक केलेल्या तिघांची नावे आहे. पोलीस नाईक राजू वाघ यांना त्यांच्या खबरीकडून ही माहिती मिळाल्यावर त्यांनी ती वरिष्ठांना दिली. पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे, पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे, उपनिरीक्षक अनिल भिसे, तसेच पोलीस शिपाई अजय कदम, सुरेश माळी, सुरेश डहाके, संदीप पवार यांनी ही कामगिरी केली. त्यांना पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मार्गदर्शन केले.
राजू वाघ यांना चांद याच्याबाबत सुरूवातीला माहिती मिळाली. त्यांनी त्याला त्याच्या सर्जेपुरा येथील घरातच ताब्यात घेतले. पोलिसांबरोबर येत असतानाच त्याने खिशातील पैसे रस्त्यात टाकून दिले. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुसऱ्या साथीदारांची नावपत्त्यासह माहिती दिली. त्यातील सद्दाम व इरफान हे पोलिसांना त्यांच्या घरातच सापडले. अन्य दोघे मात्र फरार झाले. त्यांची नावे पोलिसांनी सांगितली नाही. त्यातील एकजण या गुन्ह्य़ाचा मुख्य सुत्रधार असल्याचे पकडलेल्या तिघांनी पोलिसांना सांगितले आहे. चोरीच्या रकमेतील उर्वरित रक्कम त्यांच्याकडे असल्याची माहितीही तिघांनी पोलिसांना दिली.
चोरी झाल्यानंतर त्याच रात्री (शनिवार) पोलिसांनी बँकेचा रोखपाल आदिनाथ एकनाथ आढाव, योगेश सुखदेव बारगळ व ललीत सुभाष चौधरी यांना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने २६ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आज ताब्यात घेतलेले तिघे व हे बँकेतील तिघे यांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस आता घेत आहेत. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली असून ती ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.