भांडवली खर्चाच्या वसुलीसाठी ग्राहकांवर लादली गेलेली वीज दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी मंगळवारी निमा व आयमा या औद्योगिक संघटनांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करून दोन्ही बाजुंची वाहतूक बंद पाडली. आंदोलनात उद्योजकांसह कामगार व ग्राहक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महामार्गावरील वाहतूक कोलमडल्याने पोलिसांनी ५० ते ६० आंदोलकांना अटक केली. यावेळी काही आंदोलकांचे पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दीक वादविवादही झाले. सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांची सहजपणे सुटका होणार नाही याची दक्षता घेतली.
महावितरण कंपनीने सहा हजार कोटींच्या भांडवली खर्चाची वसुली ग्राहकांकडून चालविली आहे. परिणामी, सध्या वीज देयकांमध्ये ४० ते ४५ टक्क्यांची वाढ झाली असून सर्वसामान्यांसह उद्योजक, व्यापारी व अन्य व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर, मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) या संघटनांच्या पुढाकाराने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. परंतु, ऐनवेळी आंदोलनाचे स्थळ बदलण्यात आले. आंदोलकांनी थेट जुन्या जकात नाक्याच्या पुढील महामार्गावर धाव घेऊन रास्ता रोको सुरू केला. यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. निमाचे अध्यक्ष मनिष कोठारी, आयमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. मंदीच्या सावटामुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात वीज देयकांतील वाढीमुळे उद्योजक डबघाईला जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या दरवाढीत उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी असे सर्व ग्राहक भरडले गेले आहेत. मुळात महावितरण जो भांडवली खर्च करते, त्याच्याशी ग्राहकांचा थेट संबंध नसतो. असे असूनही वीज ग्राहक नियामक आयोगाने ६ हजार कोटी रुपयांच्या वसुलीला मान्यता दिली. वीज देयकांतील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच्या तुलनेत दुपटीने देयके येत असून त्याचा ग्राहक संघटनांनी निषेध केला. भाजप व आम जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागण्यास सुरूवात झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचे प्रयत्न केले. परंतु, कोणी मागे हटण्यास तयार नव्हते. यावेळी डॉ. कराड व बेळे यांचे पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दीक वादही झाले. अखेर पोलिसांनी ८० ते १०० जणांना ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यास नेण्यास सुरूवात केली. सर्व आंदोलकांविरुध्द कलम ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरवी आंदोलन झाल्यावर ‘अटक व सुटका’ असे घडते. परंतु, आंदोलकांवर या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना लगेच पोलीस ठाण्याबाहेर पडता आले नाही. जामीन दिल्यावर सुटका केली जाईल, असे पोलीस यंत्रणेने सूचित केले.
जळगाव येथेही आंदोलन
जळगाव येथे मनसेच्यावतीने आयोजिलेल्या रास्ता रोको आंदोलनात औद्योगिक, यंत्रमागधारक, शेतकरी व वीजग्राहक संघटनांचे पदाधिकारी व नागरीक सहभागी झाले होते. शहरातील अजिंठा चौफुलीवर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आले. हे वाढीव दर कमी न झाल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख विनय भोईटे यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा