अभिनेता अभिषेक कपूर  ‘गट्टू’ या नावाने इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. नातं सांगायचं म्हटलं तर अभिनेता जितेंद्रचा हा पुतण्या. पण, बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करू पाहणाऱ्या अभिषेकला आपली अशी ओळख अजिबात आवडत नाही. आणि म्हणूनच आपल्या मताप्रमाणे वागणारा, आपल्याला हवा तेवढा वेळ घेऊन काम करणारा असा हा अभिनेता-दिग्दर्शक आहे. हिंदीत त्याचा श्रीगणेशा अभिनेता म्हणूनच झाला होता. आज ती ओळख पुसली गेली आहे. ‘रॉक ऑन’सारखा वेगळा आणि दर्जेदार चित्रपट देणारा, चारचौघांपेक्षा वेगळा विचार करणारा, कोणतीही भीड न ठेवता आपली मते मांडणारा नव्या पिढीचा दिग्दर्शक म्हणून त्याची ख्याती आहे. आणि आपल्याला हीच ओळख अभिमानाने मिरवायला आवडते, हे दिलखुलासपणे सांगणारा ‘काय पो चे’चा दिग्दर्शक अभिषेक कपूर याचा ‘वीकपॉइंट’ काय असेल…
‘रॉक ऑन’ चित्रपटानंतर ‘काय पो चे’ करण्यासाठी चार वर्षे का जावी लागली?
‘रॉक ऑन’ चित्रपटाला मिळालेले यश माझ्या दृष्टीने अनपेक्षितच होते. तो यशस्वी करण्यासाठी मी मेहनतही तेवढीच घेतली होती. एक तर इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल केल्यानंतर मला हे यश मिळालं होतं. त्यामुळे ‘रॉक ऑन’ चित्रपटानंतर मी थोडा आराम केला. त्या काळात मी पुस्तक वाचण्याशिवाय काहीही करत नव्हतो. चेतन भगतचं ‘थ्री मिस्टेक्स इन माय लाइफ’ हे पुस्तक वाचलं आणि मला माझ्या पुढच्या चित्रपटाची कथा सापडली असं वाटल्यावर मग मी कामाला लागलो. पण, असं एवढी वर्षे का घेतली वगैरे हा विचार मी करत नाही. एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटल्याशिवाय मी ती करत नाही. ‘काय पो चे’ हा माझा चित्रपट आहे आणि तो माझ्या मनाला भावला तसाच प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, ही इच्छा होती.
चेतन भगतच्या सगळ्याच पुस्तकांवर चित्रपट येतायत.. मग तुला ‘थ्री मिस्टेक्स इन माय लाइफ’च का आवडलं?
मला चेतनच्या ‘टू स्टेट्स’ या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची ऑफर आली होती. ‘टू स्टेट्स’ हा विवाहाविषयी होता. आणि त्यात नायक-नायिका अशा दोनच व्यक्तिरेखा महत्त्वाच्या होत्या. मला त्यात फारसा रस वाटत नव्हता. ‘थ्री मिस्टेक्स इन माय लाइफ’ ही तीन मित्रांची कथा आहे. ते तरुण आहेत. त्यांच्यात मैत्रीचा धागा दृढ आहे, आयुष्यात नवनवे अनुभव तरुण वयात आपल्या वाटय़ाला येतात आणि त्यातून आपण घडतो त्या ऐन तारुण्याच्या, उमेदीच्या वयात ते आहेत. आणि या वयात भरपूर काही घडत असतं. काही बरोबर पण बरंच काहीसं चुकीचं घडत असतं. या कथेत नायकाबरोबर जे घडतं ते कु ठेतरी मला माझ्या अनुभवाच्या जवळ नेणारं वाटलं. माझ्या आयुष्यातल्या चुका मला आठवल्या आणि कुठेतरी हे चित्रपटातून मांडावंसं वाटलं. बरं हा विषय वाटतोतितका सोपा नाही. तीन मित्रांमधली केमिस्ट्री रंगवणं हे एक आव्हान होतं आणि म्हणूनच हा चित्रपट करणं मला महत्त्वाचं वाटलं.
चित्रपटासाठी कथानकात बदल करण्याचं स्वातंत्र्य तुला होतं का?
कथा आणि सिनेमाची पटकथा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कथेत जे लिहिलं आहे ते सगळंच्या सगळं चित्रपटात उतरवणं शक्यच नसतं. त्यामुळे चित्रपटासाठी म्हणून जेव्हा कथा लिहिली जाते तेव्हा ती मूळ कथेपेक्षा वेगळीच असते. आम्ही पटकथेवर काम करण्यासाठीच जवळजवळ अडीच वर्षे घेतली आहेत. ‘काय पो चे’ करताना कथेत पन्नास टक्के बदल नक्कीच आहे.
‘काय पो चे’मध्ये तिन्ही नवीन कलाकार आहेत..
हो आहेत ना. यामागे अगदी विशिष्ट कारणच आहे असं सांगता येत नाही. पण, कथेतील तीन तरुणांसाठी आजच्या नावाजलेल्या कलाकारांना घेणं शक्यच नव्हतं. जी केमिस्ट्री मला अपेक्षित होती ती एकदम नवख्या आणि ताज्या दमाच्या कलाकारांकडूनच मिळेल, हे माझ्या मनात पक्कं होतं. त्यामुळे मोठय़ा कलाकारांचा विचारच मी केला नव्हता. चित्रपटासाठी रीतसर ऑडिशन्स झाल्या. सुशांत सिंग राजपूत, अमित साध आणि राजकुमार यादव या तिघांनी अफलातून काम केलं आहे त्यामुळे मी माझ्या निर्णयावर खूश आहे.
‘रॉक ऑन’मध्येही नवे चेहरे होते..
जाणीवपूर्वक किंवा ठरवून केलेल्या गोष्टी नाहीत त्या. एक तर तुमच्या कथानकाची गरज काय आहे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि चित्रपटाचं काम जसं जसं पुढे सरकत जातं ना तसं तसं अनेक गोष्टी त्यात नवीन येत राहतात, बदल केले जातात. ‘रॉक ऑन’ चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत. पण, माझ्या चित्रपटाला नावाजलेल्या कलाकारांची गरज आहे का?.. मला नाही तसं वाटत. मोठे कलाकारही कधीतरी नवीनच होते ना. आणि लोकांना नव्या कलाकारांनी केलेले चित्रपटही आवडतात. तुमचा आशय महत्त्वाचा असतो. नेहमीच मोठय़ा कलाकारांमुळे चित्रपट चालतात, असं होत नाही. इंडस्ट्रीतील लोकांनी आता काळाबरोबर अधिकाधिक समजूतजदार होण्याची गरज आहे.
‘रॉक ऑन’चे संगीत हा त्याचा आत्मा होता, ‘काय पो चे’च्या गाण्यांविषयी काय सांगशील?
‘काय पो चे’मध्येही संगीत महत्त्वाचे आहे. या चित्रपटासाठी भारतीय सुरावटीचेच पण हळुवार असे संगीत जे आजच्या तरुण पिढीला आवडते तेच मला हवे होते. त्यामुळे या वेळी ‘देव डी’ फेम अमित त्रिवेदीकडे संगीताची जबाबदारी सोपवली होती. अमितने स्वत: या चित्रपटात दोन गाणी गायली आहेत.
आयटम साँँग..
‘आयटम साँग’ हा अगदी निर्बुद्ध प्रकार आहे. चित्रपटसृष्टीतील जाणकार दिग्दर्शक आणि निर्मातेही या आयटम साँगचे समर्थन का करतात हेच समजत नाही. इथे बुरसटलेल्या विचारांनीच जगणारे लोक जास्त आहेत. त्यांना आपल्या त्या चौकटीतून बाहेरही यायचे नाही आणि तसे करू पाहणाऱ्यांची कौतुकाने पाठ थोपटायची एवढा मोठेपणाही त्यांच्याकडे नाही. हे एक दुष्टचक्र आहे.
तुझ्यासारखे नवे दिग्दर्शक हे दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणता येईल का?
नक्कीच! गेल्या काही वर्षांत नवनवीन दिग्दर्शकांनी आशयात्मक सिनेमांवर भर दिला आहे. कुठेतरी व्यावसायिक सिनेमाच्या पलीकडे जाऊन मनोरंजनातूनच मूल्ये, विचार, जाणिवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, आमच्या प्रयत्नांना हवा तसा पाठिंबा आजही दिला जात नाही. आजही इथे निर्मात्यांना शंभर कोटी, दोनशे कोटी मिळवून देणारा कलाकार, तसेच मसालापट हवे आहेत. माझे म्हणणे आहे की आम्ही आमच्या चित्रपटाला इतक्या कोटीच्या मर्यादा घालूनच का घ्याव्यात. माझ्या चित्रपटावर माझा विश्वास आहे, त्याने मला पाचशे कोटी मिळवून दिले पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. एवढे मिळाले, तेवढे मिळाले म्हणजे हिट हे ठरवणारे तुम्ही कोण..
तुझा वीकपॉइंट काय आहे..
मी माझ्या चित्रपटांवर जास्तच प्रेम करतो आणि हाच माझा ‘वीकपॉइंट’ असावा. माझा हा वीकपॉइंट माझ्या निर्मात्यांनाही वीक करून टाकतो..पण, फिकीर नाही कारण माझा चित्रपट तर स्ट्राँग उतरतो..