सरकारची धोरणे, कायदेपालन यापेक्षा बदलांना होणारा सामाजिक विरोध ही आज खरी अडचण आहे. त्यावर मात करायला शिकले पाहिजे. तसेच उद्यमशीलता व संशोधन यांचा समन्वय साधून रोजच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने पूरक ठरणाऱ्या उत्पादन निर्मितीवर भर देणे आवश्यक ठरले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे केले.
यशवंत गर्दे स्मृत्यर्थ सीएमआयएच्या वतीने एमआयटी महाविद्यालयात डॉ. काकोडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘नावीन्यपूर्णत:’ (इनोव्हेशन) या अंतर्गत ‘टुवर्डस् अॅण्ड इनोव्हेशन सोसायटी’ या विषयावर डॉ. काकोडकर यांनी विचार मांडले. नवोपक्रमाच्या दृष्टीने विविध दाखले देऊन त्यांनी नव्या बदलांना सामोरे जाताना जुन्या, पारंपरिक व सांस्कृतिक प्रभावाखाली अजून होत असलेल्या सामाजिक विरोधाविषयी आता अधिक जागरूक होण्याची आवश्यकता व्यक्त केली. जुन्या काळात घरा-घरात भारतीय ब्रँडच्या वस्तू आता मात्र कालबाह्य़ झाल्या आहेत. याचे कारण त्या त्या काळात अपरिहार्य बदलांना स्वीकारले गेले नाही. उलट अजूनही ती मानसिकता गेलेली नाही. त्यामुळे आजच्या काळात उद्यमशीलता व संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. अभियात्रिकी विद्यार्थ्यांनीही अनुकरणप्रियता सोडून आधुनिक बदलांना अनुरूप शिक्षणाची गरज आत्मसात केली पाहिजे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
‘स्थानिक-राष्ट्रीय समन्वय हवा’
तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. काकोडकर यांचे भाषण झाले. भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विविध जागतिक संस्थांच्या अहवालानुसार २०५०पर्यंत भारत अव्वलस्थानी असेल. मोठी लोकसंख्या ही आपली ताकद असून, त्यामुळे अनेक संधीही उपलब्ध आहेत. स्थानिक व राष्ट्रीय विकासकार्यात समन्वय साधण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त संजयकुमार आदी या वेळी उपस्थित होते.
सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसंदर्भात या वेळी पथनाटय़ सादर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा