येथील औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठय़ात ऐन दिवाळीत २५ टक्के कपातीचा फटका बसणार आहे. दररोज केवळ १६ तासच पाणी उपसा केला जावा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे ४० एमएलडी पाण्याचा उपसा होण्याची शक्यता आहे. काही बिअर व दारू कंपन्यांना गेल्या महिनाभरापासून कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. पाणीकपातीच्या निर्णयास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. अशा प्रकारचे आदेश दिले नसल्याचे जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी स्पष्ट केले.
पैठणच्या शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठय़ाची वीज तोडण्याचे आंदोलन नुकतेच केले. त्यानंतर पैठणच्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. औद्योगिक वसाहतीसाठी ब्रह्मगव्हाण येथून पाणीपुरवठा होतो. त्याची क्षमता ५२ एमएलडी एवढी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून उपसा करणारी यंत्रणा योग्य त्या क्षमतेने कार्यरत नव्हती. त्यात आता पाणीकपात करण्याचेही ठरविण्यात आले आहे. चार पंपहाऊसमार्फत होणारा २४ तासांचा उपसा आता १६ तासांवर आणला जाणार आहे. पाण्याचे काटकसरीने नियोजन करा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. पाणी कपातीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्या जातात. या संदर्भात जिल्हाधिकारी कुणालकुमार यांना विचारले असता त्यांनी पाणी कपातीच्या सूचना दिल्या नसल्याचे सांगितले. तथापि, एमआयडीसीच्या सूत्रांनी मात्र २५ टक्के पाणी कपात होईल, असे सांगितले.
औद्योगिक वसाहतीच्या पाण्यात २५ टक्के कपात?
येथील औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठय़ात ऐन दिवाळीत २५ टक्के कपातीचा फटका बसणार आहे. दररोज केवळ १६ तासच पाणी उपसा केला जावा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे ४० एमएलडी पाण्याचा उपसा होण्याची शक्यता आहे.
First published on: 09-11-2012 at 11:12 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indutrialist colony will get 25 less water supplay