लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी प्रचारादरम्यान आघाडीने तयार केलेली एकप्रकारची ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ही निष्प्रभ ठरल्याचे दिसत आहे. भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रारंभी एकतर्फी वाटणारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचल्यावर अवघड वळणावर येऊन ठेपल्याची जाणीव राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला झाली होती. त्यामुळे निवडणुकीत कोणताही धोका न पत्करण्यासाठी आपत्ती निवारणार्थ संपूर्ण यंत्रणाच कार्यरत करण्यात आली होती. महायुतीचे हेमंत गोडसे यांनी प्रचारात मारलेली मुसंडी आघाडीतील काही नेत्यांना धोक्याची जाणीव करून देत होती. त्यामुळे हे आव्हान परतवून लावण्यासाठी आघाडीने राज्यस्तरीय नेत्यांची फौजच्या फौज प्रचाराच्या मैदानात उतरवली होती. परंतु मोदी लाटेसह विविध कारणांमुळे आघाडीची ही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अगदीच निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले.
कोटय़वधींच्या विकास कामांचा गवगवा आणि छगन भुजबळ यांच्यासारखा बलाढय़ उमेदवार असल्याने नाशिकची जागा कायम राखण्यात आघाडीला कोणतीही अडचण येणार नाही. असेच प्रारंभीचे चित्र होते. परंतु प्रचाराचा एकेक दिवस पुढे सरकू लागला. आणि चित्र बदलू लागले. वेगवेगळे कारण पुढे करून भुजबळांच्या प्रचारापासून अलिप्त राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. प्रचारफेऱ्यांमध्ये एकत्र आणि नंतर परिस्थिती विचित्र असे चित्र दिसू लागले. सिन्नरमध्ये तर असंतोषाचा जाहीर भडका उडाल्यानंतर मित्रपक्षानेच लावलेली ही आग अधिक फैलावण्याचे चिन्ह दिसताच भुजबळांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेलाच पाचारण केले. त्याअंतर्गत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योग मंत्री नारायण राणे, जितेंद्र आव्हाड हे त्रिकूट मदतीला धावून आले. शरद पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकला. जाहीर सभा तसेच वेगवेगळ्या नेत्यांच्या बैठका घेत आघाडीधर्म पाळण्याचे आवाहन केले. सिन्नरमधील परिस्थिती काबूत आणण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर शिल्लक राहू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंब बोलविण्यात आला. बारामती मतदारसंघातील पाणी तोडण्याच्या कथित धमकी प्रकरणाने स्वत:च अडचणीत सापडलेल्या अजितदादांनी नाशिक मतदारसंघात एकाच दिवसात तीन सभा घेतल्या. तरीही सिन्नरचा रागरंग काही व्यवस्थीत नसल्याची जाणीव झाल्याने भुजबळांनी सिन्नरमधील ‘असंतोषाचे जनक’ माणिक कोकाटे यांना शांत करण्यासाठी त्यांचे गुरू नारायण राणे यांना पाचारण केले. मुलाच्या प्रचारातून एक दिवस वेळ काढून राणे सिन्नरला येऊन गेले. जाहीर सभेत भुजबळ हे आपले राजकीय गुरू असल्याचे सांगत त्यांनी विकासासाटी भुजबळांना मतदान करण्याचे आवाहन केले.
याशिवाय महायुतीच्या उमेदवारावर जातीय प्रचाराचा आरोप करणाऱ्यांनी परप्रांतीयांची मते खेचण्यासाठी वेगळे नेते, अल्पसंख्यांकांना आवाहन करण्यासाठी वेगळे नेते अशी खास सामाजिक आणि धार्मिक वर्गवारीही केली. त्यानुसार डी. पी. त्रिपाठी, कृपाशंकर सिंग या परप्रांतीय नेत्यांच्या सभा अंबड, सातपूर अशा भागात तर, खा. माजीद मेमन, नबाब मलिक यांच्या सभा जुने नाशिक, चौक मंडई या ठिकाणी घेण्यात आल्या. खान्देशातील मंडळींसाठी अरूणभाई गुजराथी यांनाही पाचारण करण्यात आले होते. या सर्व नेत्यांनी चौका-चौकात सभा घेत भुजबळांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. या सर्व प्रकारांमुळे भुजबळ यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण झाल्याचा संदेश मतदारांमध्ये पोहोचला. महायुती आणि मनसे यांच्यात मत विभागणीचे स्वप्न आघाडीकडून पाहण्यात येत होते. परंतु राज ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतरही मनसे उमेदवाराचा फिका पडलेला प्रचार आणि परिणामी महायुतीकडे एकवटणारी मते याचा परिणाम काय होऊ शकतो, हे कायम जनसंपर्कात असलेल्या आघाडीच्या काही नेत्यांना कळून चुकले होते. अखेर त्यांची भीती खरी ठरली. भुजबळ यांचा ‘न भुतो न भविष्यति’ असा पराभव झाला. या पराभवामुळे नाशिकमधील भुजबळांचे साम्राज्य खालसा झाल्याची भावना विरोधकांची झाली आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता आता भुजबळ हे पुढील धोरण कसे आखतील याची आघाडीसह विरोधकांनाही उत्सुकता आहे.
छगन भुजबळांसाठीची ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ही निष्प्रभ
लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी प्रचारादरम्यान आघाडीने तयार केलेली एकप्रकारची
First published on: 22-05-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ineffective campagin planing from ncp cause bhujbal defeat