मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी करण्यात येणारी डी.डी.टी. फवारणी कुचकामी असल्याचे ‘मलेरिया संशोधन केंद्रा’ने स्पष्ट केल्यानंतरही आरोग्य खाते अजूनही गाढ झोपेतच असल्याचे दिसून येत आहे. ज्याने डास मरतच नाही, अशा डी.डी.टी.ची फवारणी करून आरोग्य खाते नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारीच करू लागले आहेत.
डेंग्यू हा आजार ‘एडिस इजिप्ती’ जातीचा डास चावल्यामुळे होतो. एडिस एजिप्तीचे प्रजनन पाण्याच्या टाक्या, डेझर्ट कुलर, सेप्टिक टँकमध्ये होते. या जागाच स्वच्छ केल्या जात नसल्याने फवारणीचा काहीच फायदा होत नाही. त्यातच डी.डी.टी.चा एडिस इजिप्ती हा डास पूर्णत प्रतिकार करू शकतो. डासांचे प्रजनन पूर्ण वर्षभर सुरू असताना फवारणी केवळ उद्रेक झाल्यानंतरच केली जाते. असे असताना आरोग्य खाते करत असलेली फवारणी ही मोठीच फसवेगिरी असल्याचे मत आरोग्य खात्यातील मलेरिया नियंत्रण विभागातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर व्यक्त केले.  मलेरिया हा ‘अ‍ॅनाफिलिस’ डासाच्या मादीमुळे होतो व डेंग्यू, चिकन गुनिया ‘एडिस इजिप्ती’मुळे होतात. या दोन डासांमध्ये बराच फरक आहे. मलेरिया नियंत्रणासाठी डी.डी.टी.ची फवारणी व तापासाठी रुग्णांना ‘क्लोरोक्विन’ची गोळी दिली जाते. देशात १९६० मध्ये यशस्वी झालेली ‘मलेरिया नियंत्रण मोहीम’ १९७० मध्ये मात्र कोलमडली. कारण, डी.डी.टी. फवारणीमुळे डासच मरत नसल्याचे ‘मलेरिया संशोधन केंद्रा’ने स्पष्ट केल्यानंतरही गेल्या ४० वर्षांंपासून मलेरियाची साथ पसरलेल्या परिसरात डी.डी.टी.चीच फवारणी करून धूळफेक केली जात आहे.
आज ‘वायमॅक्स’ मलेरियाबरोबरच ‘फॅल्सीपॅरम’ या अतिभयंकर मलेरियाचे प्रमाणही बरेच वाढत आहे. ‘क्लोरोक्विन’चा मलेरियावर काहीच उपयोग होईनासा झाला आहे. तरीही आजही खेडय़ापाडय़ात ‘क्लोरोक्विन’ वगळता अन्य कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने मलेरिया व डेंग्यूने शेकडो रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. गेल्या आठ महिन्यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात मलेरिया, डेंग्यू व इतर तापाने ४७ जणांचा मृत्यू झाला, तर ३१४ रुग्णांचे नमुने दूषित निघाले. दरम्यान, पूर्व विदर्भात रुग्णांवर आरोग्य खात्यातर्फे योग्य ते उपचार करण्यात येत आहेत, तसेच साथीचा उद्रेक झालेल्या गावांमध्ये डी.डी.टी. फवारणी सुरू असल्याचे नागपूर विभागाचे आरोग्य सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शासनाच्या आदेशाप्रमाणेच हिवताप आलेल्या रुग्णाला ‘क्लोरोक्विन’ देणे आणि ज्या गावात हिवतापाची साथ आली तेथे डी.डी.टी. फवारणी करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विशेष म्हणजे, डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेल्या अनेक कारणांकडे डोळेझाक केली जात आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, सिंचनासाठी येणाऱ्या जमिनीमुळे डास पर्यायाने मलेरिया, डेंग्यू व इतर हिवतापाचे आजार वाढत आहेत. शहरीकरणामुळे झोपडपट्टय़ा विस्तारत आहेत. उघडय़ावर झोपणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. हॅण्डपंप व बोअरवेलच्या आजुबाजूला तुंबलेले पाणी, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या नाल्या, यामुळेही डासांचा उच्छाद वाढत आहे. ‘भारतीय मलेरिया संशोधन केंद्रा’ने डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी ठरवून दिलेले निकष कुठेच पाळले जात नाहीत. मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर होण्यास अनेक कारणे असताना केवळ फवारणी करणे म्हणजे, ‘समोरून शत्रूचा रणगाडय़ाने मारा होत असताना हवेत गोळीबार करण्यासारखे आहे’ असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा