परिचारिका अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त शैक्षणिक विद्यापीठाची पदवी, पदविका नसताना तीन परिचारिका कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. यामधील एका परिचारिकाने अडचणीत येण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. एक परिचारिका अलीकडच्या काळात विधिवत सेवानिवृत्त झाली आहे. या चार परिचारिकांकडे परिचारिकेची पात्रता नसल्याने त्या पालिकेने केलेल्या चौकशीत दोषी आढळल्या आहेत. असे असताना प्रशासन त्यांना अनेक वर्षांपासून पाठिशी का घालत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महापालिकेत कोणत्याही पदासाठी भरती होत असताना त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तपासली जाते. परिचारिकेचा थेट संबंध रुग्णाच्या जिवाशी येतो. या चार परिचारिकांना पालिकेच्या रुग्णालयात, दवाखान्यात सेवा देण्यासाठी नियुक्त करून वैद्यकीय विभागातील अधिकारी रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याची टीका होत आहे. या चार परिचारिकांची नावे ‘लोकसत्ता’कडे आहेत.
या चार परिचारिकांच्या शैक्षणिक पात्रतेची यापूर्वी प्रशासनाने चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडे पदव्या नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. काही पालिका अधिकारी, सामान्य प्रशासन, वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून या परिचारिका पालिका सेवेत टिकून असल्याचे बोलले जाते. या परिचारिका शैक्षणिक पात्रतेत दोषी आढळल्या असल्याचा अहवाल प्रशासनाने यापूर्वीच तयार केला आहे.
मग त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन टाळाटाळ का करीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपल्यावर होणारी कारवाई टळली जावी या हेतूने तीन परिचारिकांनी बाहेरच्या प्रांतांमध्ये चारशे ते पाचशे रुपयांमध्ये मिळणारी परिचारिका शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे पालिकेत दाखल केली आहेत. ही प्रमाणपत्रे पण बोगस असल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय आरोग्य विभागात येणारा प्रत्येक अधिकारी या तिन्ही परिचारिकांना पाठिशी घालत असल्याने या तिघींचा गॉडफादर कोण, असे प्रश्न पालिकेत आता उपस्थित केले जात आहेत.
एखाद्या रुग्णाच्या जिवाचे काही बरेवाईट होण्याची वाट प्रशासन पाहात आहे का, सर्वपक्षीय नगरसेवक या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून का गप्प बसले आहेत, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी विचारले असता, त्यांनी याप्रकरणी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत हा विषय येतो. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता प्रतिक्रियेसाठी कोणी उपलब्ध झाले नाही.
पंधरा वर्षांपूर्वी या परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जाते. एका परिचारिकाने काही काळ सेवा केल्यानंतर आपण नंतर अडचणीत येऊ या भीतीने यापूर्वीच पालिका सेवेचा राजीनामा दिला. अन्य एक परिचारिका अलीकडच्या काळात सेवानिवृत्त झाली. दोन परिचारिका कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि बाजारपेठमधील अन्सारी चौकातील पालिकेच्या दवाखान्यात रुग्णसेवा देत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पात्रता नसलेल्या परिचारिका अनेक वर्षे पालिकेच्या सेवेत!
परिचारिका अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त शैक्षणिक विद्यापीठाची पदवी, पदविका नसताना तीन परिचारिका कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत.
First published on: 18-06-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ineligible nurses still working from many years