कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभारामुळे पालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात साथीचे रोग पसरत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून पुढे येऊ लागल्या आहेत. मलेरिया निर्मूलनासाठी प्रशिक्षित कामगारांचा अभाव, नागरी आरोग्य केंद्रांकडून अहवाल देण्यात कुचराई होणे, यामुळे हे प्रकार वाढीस लागल्याचे बोलले जात आहे. रुग्णांचे अहवाल पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यातही दिरंगाई सुरू असल्याचे बोलले जाते.  
सक्षम असा मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पालिकेला मिळत नसल्याने शहराचे आरोग्य बिघडत चालले असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून होत आहे. १६ मलेरिया कामगार शहराच्या विविध भागात साथरोग निवारण, शोधण्याचे काम करीत आहेत. डासांच्या अळ्या कोठे असतात याविषयीचे पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळे निर्मूलनाचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची टीका होऊ लागली आहे. डेंग्यू, हिवताप, टायफॉइड असे अनेक साथीचे रोग शहरात पसरले आहेत. या रुग्णांचे रक्त व अन्य तपासण्यांचे नमुने अहवाल पुणे येथे पाठविण्यात येतात. मात्र यासंबंधी पाठपुरावा करण्यात आरोग्य विभाग फारसा तत्पर नसल्याचे दिसून येत आहे. रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविलेल्या किती रुग्णांना कोणत्या सुविधा दिल्या याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागात गोंधळ आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे सांगण्यात येते. खासगी लॅबमधून रुग्णांचे अहवाल पालिकेने मिळवणे आवश्यक आहेत. त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. या समन्वयाच्या अभावामुळे शहर मात्र साथरोगांच्या विळख्यात सापडत चालल्याची टीका होत आहे.

Story img Loader