विधानासभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही तास शिल्लक राहिलेले असल्याने पोलिसांनी विविध ठिकाणी उभारलेल्या तपासणी नाक्यांवर वाहनांची जोरदार तपासणी सुरूकेली असून एखाद्या वाहनात रोख रक्कम मिळाल्यास चौकशी, पंचनामा, जप्ती या सोपस्कारांअगोदर त्या रोख रकमेचे अँड्रॉइड मोबाइलवर फोटो काढून वरिष्ठांना व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री उशिरा तपासणी नाक्यांवर बंदोबस्ताला असलेल्या अधिकाऱ्यांना फोटो अपलोड करण्याची डय़ुटी पूर्ण करावी लागत आहे. मोबाइलच्या या वापराबरोबरच टॉर्च बरोबर बाळगण्याचा त्रासदेखील कमी झाला असून मोबाइलमधील टॉर्चचा वापरही वाहन तपासणीसाठी केला जात असल्याचे दिसून आले.
राज्यात वाहन तपासणीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नवी मुंबईतील चार मतदारसंघांसाठी साडेचार हजार पोलीस आणि पाचशे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत केंद्र तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात ३४ मतदार केंद्रे संवेदनशील असल्याने सोमवारपासून १५ तपासणी नाक्यांवरील तपासणी सक्त करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी महिला बंदोबस्ताला नसल्याने वाहनात महिला असल्यास त्यांना सोडले जात आहे. काही पक्ष याच संधीचा फायदा घेत आहेत. वाहनांची तपासणी करताना एखाद्या वाहनात रोख रक्कम आढळून आल्यास त्याचे तात्काळ चित्रीकरण केले जात आहे. बंदोबस्ताला असलेले अधिकारी ह्य़ा रोख रकमेचे आपल्या अँड्रॉइड मोबाइलवर फोटो काढून तात्काळ पोलीस ऑफिसर ग्रुपवर लोड करीत असल्याचे आढळून आले. वरिष्ठांनी तशा सूचना केल्याचे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी पकडलेल्या रोख रकमेच्या काही ठिकाणी अफरातफरी झाल्याच्या तक्रारी आहेत. जप्त न करता या रोख रकमा गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाहनामध्ये तपासणी करताना फोटो काढून ते पाठविण्याच्या सूचना उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तपासणी नाक्यावरील इत्थंभूत माहिती वरिष्ठांना काही क्षणात उपलब्ध होत आहे. नवी मुंबईत आतापर्यंत ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मोबाइलचा वापर रोख रकमेचे फोटो काढून अपलोड करण्याबरोबरच त्या मोबाइलमधील टॉर्चचादेखील पोलिसांना उपयोग होत आहे. यापूर्वी तपासणी करण्यासाठी पोलिसांना प्रखर झोताच्या टॉर्च सांभाळण्याची आवश्यकता भासत होती. मोबाइलमुळे ते कामही हलके झाले आहे. त्यामुळे काही तासांत मोबाइलची बॅटरी संपत आहे. तरीही मोबाइल टॉर्च सोयीची वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवादाचे सोपे, साधे आणि मोफत माध्यम असल्याने सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप करण्यात आला असून पोलीस आयुक्तालयात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे चित्रण तसेच माहिती तात्काळ देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांना तपासणी नाक्यावरील कारवाईची माहिती उपलब्ध होत असून पुढील कार्यवाहीचे आदेश देणे सोपे होत आहे.
फत्तेसिंह पाटील,
अप्पर पोलीस आयुक्त, नवी मुंबई<br />