आगामी कुंभमेळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. संदीप फाऊंडेशन व एमआयटी विद्यापीठ यांच्यातर्फे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत येथे आयोजित ‘कुंभ थॉन २०१५’ कार्यशाळा हा त्याचाच एक भाग. प्रत्येक समस्येबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणाद्वारे सुचविलेले उपाय संकेतस्थळावर मांडण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी शासकीय पातळीवर सुरू झाली असताना दुसरीकडे वेगवेगळ्या संस्था व संघटनांनी आपापल्या परीने त्याच्या नियोजनात हातभार लावण्याची धडपड सुरू केली आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी कार्यशाळेच्या निमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्यात भेडसावू शकणाऱ्या समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात देशासह परदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. महापर्वणीच्या दिवशी हा आकडा कित्येक पटीने वाढतो. प्रचंड गर्दीमुळे या काळात प्रामुख्याने वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, गुन्हेगारी, निवास व्यवस्था, गर्दीचे नियोजन, सार्वजनिक सुरक्षितता, वाहनतळ, फसवणूक आदी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करून उपरोक्त समस्यांवर उपाययोजनांची संगणकीय आज्ञावली तयार करून अंमलात आणण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुनील खांडबहाले व सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सामाजिक समस्यांचे निराकरण करणे व नवीन उद्योजक तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कुंभमेळ्यादरम्यान भेडसावणाऱ्या समस्या व नियोजन हे शासन दरबारी वा उद्योजकांकडे न सोपविता नवीन उद्योजकांकडून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमात महाराष्ट्र पोलीस, भोसला सैनिकी विद्यालय, रिलायन्स, महिंद्रा, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, नाशिक महापालिका, निमा, एमकेसीएल, खांडबहाले डॉट कॉम आदींचा सहभाग असणार आहे.
कार्यशाळेत जागतिक स्तरावरील पेटे बेल ऑफ इंडिका, हावर्ड आणि एमआयटीचे टेप्पो जौट्टेनस, एमआयटी मीडिया लॅबचे जॉन वॉर्नर, रिलायन्सचे अरविंद चिंचोरे आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या समस्यांवर सर्वेक्षण करून काही उपाय सुचविले आहेत. कार्यशाळा सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यावसायिकांसाठी खुली आहे. त्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.
कुंभमेळ्यातील समस्यांवर माहिती तंत्रज्ञानाद्वारे उपाय
आगामी कुंभमेळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे
First published on: 22-01-2014 at 08:46 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information technology helps out kumbh mela problems