कराड आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित बांधकाम साहित्य विषयक ‘वास्तुविश्व -२०१२’ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. १८) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय कदम, उपाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाबाबत माहिती देताना धनंजय कदम म्हणाले की, उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीनिवास पाटील राहतील. नांदेड सिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष सतीश मगर, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कराड व मलकापूर परिसरातील आर्किटेक्ट व अभियंत्यांनी १९९१ ला या संस्थेची स्थापना केली आहे. शंभराहून अधिक सदस्य असणाऱ्या या संस्थेने बांधकाम, वास्तुरचना, नागरी सुविधा आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, तांत्रिक चर्चासत्रे आयोजित केली आहेत. कराड पालिकेच्या सहकार्याने स्थापत्यविषयक अनेक प्रश्न वेळोवेळी पूर्णत्वास नेले आहेत. अभियंतादिनाचे औचित्य साधून स्थापत्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्याला दरवर्षी दिला जाणारा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार  ज्येष्ठ अभियंता आप्पासाहेब उर्फ शंकर पेंढारकर यांना देण्यात येणार आहे.  या प्रदर्शनामुळे ग्राहक व उत्पादक यांच्यात सुसंवाद साधणे, वेगवेगळय़ा कार्यशाळा आयोजित करणे व सामान्यांमध्ये बांधकामविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तरी लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा