गेल्या चार महिन्यापासून मेडिकलची सुरक्षा व्यवस्था उधारीवर आणलेल्या ३० ते ४० सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात वैद्यकीय संचालकाकडे जादा सुरक्षा रक्षक देण्याविषयीचा प्रस्ताव पाठविला होता मात्र, हा प्रस्ताव सध्या शासनाकडे थंडबस्त्यात आहे. दिवसेंदिवस मेडिकमध्ये चोरी आणि लुटपाटीच्या घटना बघता प्रशासन त्यामुळे हतबल आहे.
मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयाची ओळख आहे. दररोज हजारो नागरिकांची रुग्णालयात ये जा असते. शासकीय कार्यालयाच्या सुरक्षेबाबत राज्य शासन जागृत असल्याचा आव आणत असली तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या काही दिवसात मेडिकलच्या सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. अवाढव्य असलेल्या मेडिकलच्या सुरक्षा ही केवळ बाहेरून आणलेल्या ३० ते ४० सुरक्ष रक्षकाच्या भरवश्यावर आहे. मेडिकलमध्ये सुरक्षेसाठी पूर्वी मेस्को कंपनीचे ११० च्या जवळपास सुरक्षा रक्षक होते. परंतु त्यांनी ३ ते ४ महिने सेवा दिल्यानंतरही मेडिकल प्रशासन मेस्को कंपनीकडून त्याचे वेतन दिले जात नव्हते. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी अनेकदा काम बंद आंदोलन करून मेडिकल प्रशासनला पत्र दिले. शासनाशी पत्र व्यवहार केला मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मेडिकल प्रशासनाने मधल्या काळात सुरक्षा रक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन दिले मात्र, काम जास्त आणि पगार नाही अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून सुरक्षा रक्षकांनी मेडिकल आणि मेस्को कंपनीला इशारा देत १ मे २०१३ पासून काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे  मेडिकलमधील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला. मेडिकल प्रशासन चांगलेच गोंधळात पडल्यामुळे मेस्कोच्या सेवेला कंटाळून मेयोमधील युनिटी सुरक्षा एजन्सीचे ६० सुरक्षा रक्षक उधारीवर बोलविले आणि तूर्तास तरी तात्पुरती व्यवस्था केली आहे. नवीन सुरक्षा रक्षक एजन्सी संदर्भात मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय संचालकाकडे अहवाल पाठविला आहे मात्र तो प्रसात सध्या धुळखात पडला असून त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे म्हणाले, मेस्को कंपनीच्या सुरक्षा रक्षाच्या आंदोलनानंतर मेडिकलमध्ये सुरक्षेसाठी किमान १५० सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी वैद्यकीय संचालनालयाकडे पाठविला आहे मात्र, त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्या संदर्भात अनेकदा पत्र व्यवहार केला मात्र वैद्यकीय विभागाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. सध्या मेयोमधील युनिटी सुरक्षा एजन्सीचे ६० सुरक्षा रक्षक आळीपाळीने कामावर येत असले तरी ती सुरक्षा व्यवस्था तोकडीच आहे. राज्य शासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन मेडिकलच्या सुरक्षे व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही डॉ. पावडे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा