सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात श्वानदंश इंजेकशनऐवजी केवळ डिस्टिल्ड वॉटर असलेले इंजेकशन दिले जात असल्याचा अनुभव बुधवारी एका नगरसेवकालाच घ्यावा लागला. श्वानदंश झालेल्या रुग्णांना अॅन्टी रेबीजचे इंजेकशन न देता फक्त डिस्टिल्ड वॉटरचे इंजेकशन देऊन त्यांच्या जीवनाशी क्रूरपणे खेळ खेळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आला.
पालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांच्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघड होताच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित औषध कंपनीची माहिती मागविण्यात येत आहे. अशा प्रकारचे इंजेकशन रूग्णांना देण्याचे तत्काळ थांबविण्यात आले आहे. नगरसेवक नरोटे हे महापालिकेवर एकछत्री अंमल असलेले काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांचे विश्वासू समर्थक समजले जातात.
याबाबतची माहिती अशी की, नगरसेवक नरोटे यांना त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याने दंश केला. त्यामुळे खबरदारी म्हणून नरोटे हे अॅन्टी रेबीजचे इंजेकशन घेण्यासाठी डफरीन चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात गेले. त्यांच्या समवेत त्यांचे डॉक्टरमित्र होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने अॅन्टी रेबीज म्हणून बॉक्समधील एक छोटी बाटली काढली. त्यातील पाणी इंजेकशनमध्ये भरून ते नगरसेवक नरोटे यांना देत असताना त्या डॉक्टरमित्राने हे इंजेकशन अॅन्टी रेबीज पॉवडरविना कसे देता येईल, अशी विचारणा केली. तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने हेच अॅन्टी रेबीजचे इंजेकशन असल्याचा दावा केला. मात्र इंजेकशन देण्यासाठी म्हणून घेतलेली बाटली पाहिली असता ती चक्क डिस्टिल्ड वॉटरची बाटली असल्याचे दिसून आले. या सोबत अॅन्टी रेबीज पावडरची वेगळी बाटली असते. या दोन्हींचे समप्रमाण घेऊन ते रुग्णाला दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे. तरीही पालिका दवाखान्यात वैद्यकीय यंत्रणेकडून आपलेच खरे असल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, नगरसेवक नरोटे यांनी पालिका आरोग्याधिकारी डॉ. जयंती आडकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळातच दवाखान्यात येऊन पाहणी केली. तेव्हा संबंधित इंजेकशन हे अॅन्टी रेबीजचे नसून त्यातील डिस्टिल्ड वॉटर असलेली एकमेव बाटलीचा वापर अॅन्टी रेबीजचे इंजेक्शन म्हणून केला जात असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्याधिकारी डॉ. आडकी यांनी संबंधित औषधपुरवठादाराशी संपर्क साधला असता त्यानेही हेच इंजेकशन असल्याचे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले. आरोग्याधिकारी डॉ. आडकी यांनी वस्तुस्थिती कथन करीत, तुमचे नाव महापालिकेची फसवणूक केल्याने काळ्या यादीत घालण्याबद्दल सज्जड दम दिला. तेव्हा संबंधित औषध पुरवठादाराने आपली चूक मान्य केली. केवळ डिस्टिल्ड वॉटर पाठविण्यात आले असून प्रत्यक्षात अॅन्टी रेबीजची पॉवडर पाठविण्यात आली नाही, हे बार्शी येथील संबंधित औषधपुरवठादाराने मान्य केले तेव्हा पालिका दवाखान्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळला जाणारा हा खेळ चव्हाटय़ावर आला. हा प्रकार उघडकीस येईपयर्ंत सकाळपासून २० रुग्णांना अॅन्टी रेबीज म्हणून हेच इंजेकशन दिले गेल्याचे सांगण्यात आले. या दवाखान्यात दररोज २० ते २५ श्वान दंश झालेल्या रुग्णांना इंजेकशन दिले जाते. या सर्वाच्या जीवनाशी क्रूरपणे खेळ खेळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. त्याची वाच्यता नगरसेवक चेतन नरोटे यांच्या माध्यमातून झाली.
श्वानदंश झालेल्या नगरसेवकाला अॅन्टी रेबीजऐवजी डिस्टिल्ड वॉटरचे इंजेक्शन.
सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात श्वानदंश इंजेकशनऐवजी केवळ डिस्टिल्ड वॉटर असलेले इंजेकशन दिले जात असल्याचा अनुभव बुधवारी एका नगरसेवकालाच घ्यावा लागला. श्वानदंश झालेल्या रुग्णांना अॅन्टी रेबीजचे इंजेकशन न देता फक्त डिस्टिल्ड वॉटरचे इंजेकशन देऊन त्यांच्या जीवनाशी क्रूरपणे खेळ खेळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आला.
First published on: 13-03-2013 at 09:36 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injected distilled water instead of anti rabies to corporator