चिट फंडासाठी जमा करण्यात आलेली रक्कम मारहाण करून लुटण्यात आल्याचा बनाव करताना जखमी करण्यात आलेल्या सचिन येवले याचा शुक्रवारी पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा बनाव करणारा आरोपी सोमनाथ भोर याच्याविरूद्घ आता सचिन याच्या खुनाचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी दिली.
रेनवडी येथील चिट फंडामध्ये जमा करण्यासाठी तब्बल बारा लाख रूपये उपलब्ध करण्यास असमर्थ ठरलेल्या सोमनाथ भोर याने गेल्या मंगळवारी रक्कम जमा केल्याचा बहाणा केला होता. जमा केलेले आठ लाख रूपये फंडाचा हिशेब पाहणाऱ्या सचिन येवले याच्या घरी ठेऊ असे सांगून सोमनाथने सचिन यास दुचाकीवर बसून ते दोघे त्याच्या घरी निघाले होते. वाटेत थांबून सोमनाथ याने सचिन याच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्यास जबर जखमी केले. सचिन घायाळ झाल्यावर आमच्यावर चोरटय़ांनी हल्ला करून जवळची रक्कमही पळविल्याचा बनाव रचण्यात आला होता.
सोमनाथ व सचिन यास नारायणगाव येथील रूग्णलयात दाखल करण्यात आल्यानंतर सचिन गंभीर जखमी असल्याने त्यास पुण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारहाणीचा बहाणा करणाऱ्या सोमनाथ याचा बनाव पोलिसांनी सतर्कतेने उघड केला. सचिन याच्या डोक्यावर वार करून आपण लुटमार झाल्याचा बनाव केल्याचे त्याने कबुल केले होते.
पुण्यात उपचार सुरू असलेल्या सचिन येवले याच्याकडे फंडाचा संपूर्ण हिशेब होता सचिन याचा काटा काढून रक्कम चोरी झाल्याचे सांगितल्यावर आपल्यावरील कर्जाचे बालंट दूर होईल अशी सोमनाथ याची योजना होती. मात्र ती फोल ठरली. मात्र आज दुपारी चारच्या सुमारास सचिनचा मृत्यू झाला.
आरोपी सोमनाथ याने सचिन यास मारल्याची कबुली दिल्याने त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सचिन याचा मृत्यू झाल्याने सचिनच्या खुनाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सचिन याच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुली व एक वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Story img Loader