नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमधील पाणी तातडीने जायकवाडी प्रकल्पात सोडावे. पाणी न सोडणे हा मराठवाडय़ावर अन्याय आहे. कारण जायकवाडी धरण मराठवाडय़ातील जनतेसाठी झाले आहे, असे माजी खासदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी शुक्रवारी सांगितले. वरच्या भागातील पुढारी जायकवाडीत पाणी जाऊ नये, यासाठी आग्रही असतात. परंतु जायकवाडीत पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाडय़ातून सरकारवर दबाब कमी पडतो, याची कबुलीही त्यांनी दिली.
टोपे म्हणाले, की जायकवाडीचा साठा वाढवायाचा असेल, तर नाशिक व नगर जिल्हय़ांतील कालव्यांमधील पाणी बंद करावे. जायकवाडीचा साठा ५० टक्क्यांपर्यंत केल्यावरच वरच्या धरणांत पाणीसाठा यापुढे करावा. निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र अजूनही विकसित नाही, तरीही साठा करण्यासाठी भरून घेतात.
इतर धरणांत साठा ७५ टक्के ठेवून उर्वरित पाणी एकदाच जायकवाडीत सोडावे. जायकवाडीचा मृतसाठा २६ टीएमसी आहे. पैकी ६ टीएमसी गाळाने भरले आहे. औरंगाबाद शहरास पिण्यासाठी १.८० व जालना शहरासाठी १.९४ टीएमसी पाणी पुढील वर्षी १५ जुलैपर्यंत लागेल. दोन्ही मिळून ३.८४ टीएमसी पाणी हवे. औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसाठी १.१९ टीएमसी येत्या जुलैपर्यंत लागेल. परळी औष्णिक केंद्रासाठी ६.६५ टीएमसी पाणी जुलैपर्यंत लागेल. याप्रमाणे एकूण ११.५८ टीएमसी पाणी लागेल. ५.१६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे १६.७४ टीएमसी पाणी त्वरित जायकवाडीत सोडणे आवश्यक आहे.
जायकवाडीवरील पाणीयोजनांसाठी १५ जुलैपर्यंत ८.८३ टीएमसी तूट होईल. जायकवाडीच्या वरच्या भागात असलेल्या धरणांत करंजवण ५१ टक्के, गंगापूर ७२ टक्के, दारणा ९८ टक्के, भंडारदरा १०० टक्के, पालखेड ९६.५२ टक्के, ओझरखेड २१ टक्के, मुळा ५५ टक्के, नांदूर-मधमेश्वर १०० टक्के, निळवंडे ५० टक्के याप्रमाणे सध्या पाणीसाठा आहे. भंडारदऱ्यातून दोन महिन्यांत पाच पाळय़ा दिल्या. दारणा, गंगापूरचे पाणी चालू आहे. वरची मंडळी पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव भरून घेतात व जमिनीसही पाणी अधिक देतात.
त्याऐवजी जायकवाडीत पाणी सोडावे. मराठवाडय़ातील पुढारी मंडळी मागणीसाठी आणि दबावसाठी कमी पडतात. कोणत्याही स्थितीत आवश्यक तूट भागविण्यासाठी व्यय गृहीत धरून १४ टीएमसी पाणी नगर-नाशिकच्या धरणांतून जायकवाडीत सोडावे, अशी मागणी टोपे यांनी केली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा