गाव पातळीवर पाण्याचा हिशेब करून पाणी वापरले जावे. भूपृष्ठावरचे पाणी आणि भूजलसुद्धा सार्वजनिक मालमत्ता असल्याप्रमाणेच वापरात आणावे तसेच जो जमिनीमध्ये पाणी टाकू शकतो तोच त्याचा पुरेपूर वापर करू शकतो, अशा प्रकारची नियमावली सांगणारा प्रकल्प वळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने केला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने चिरंतन विश्वासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक स्वास्थ्य व पर्यावरण या उपविभागामध्ये ‘शेततळ्या’चा प्रकल्प या विद्यार्थ्यांकडून सादर केला जाणार आहे.
पाण्याची काटकसर करून जगायचे ठरले तर केवळ ३०० ते ३५० मि.मी. पाऊस असलेल्या भागांमध्येही चांगल्या पद्धतीने शेती करता येऊ शकते. राजेंद्रसिंग व पोपटराव पवार यांनी राबवलेल्या पाण्याच्या बचतीच्या उपक्रमातून हे सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर मराठवाडय़ातील दुष्काळावरही मात केली जाता येऊ शकते. ‘शेततळी’ हा यावरचा उत्तम पर्याय असून त्याबरोबरीनेच प्रत्येक गावामध्ये विविध नियम राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पातून अशाच नियमावलीची मांडणी करण्यात आली आहे. गावातील पाण्याचा हिशेब ठेवून त्यानुसार पाणी वापर करणे, शिवारामध्ये कोणती पिके घ्यावी हे गावाने पाणी पातळीचा अभ्यास करून ठरवणे, तसेच जमिनीत पाणी भरणाऱ्यालाच पाणी उपसण्याचा आधिकार द्यावा अशा नियमांचा त्यात समावेश आहे. दिक्षा पाटील, विशाल मौर्य या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प केला असून त्यास शिक्षक संतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले आहे. तर मुख्याध्यापक संगीता पाटील व जनार्दन पवार या सह शिक्षकांनी सहकार्य केले आहे.

Story img Loader