नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी सुरेश देवाजी रंगारी याचा गेल्यावर्षी २३ ऑक्टोबरला तर शंकर किशन खडे याचा यावर्षी २ फेब्रुवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची चौकशी नागपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय दैने यांच्या मार्फत करण्याचे आदेश नागपूर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. कारागृहातील कैद्यांच्या मृत्यूविषयी २४ मार्चपर्यंत माहिती किंवा लेखी निवेदन देण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.
दंडाधिकारी पातळीवर चौकशी करताना कैद्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण, तत्कालीन परिस्थिती तसेच कैद्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन यंत्रणेकडून दिरंगाई झाली का? कैद्याविषयी खोटे अहवाल सादर करण्यात आले आहेत का? इत्यादी बाबींवर उपविभागीय दंडाधिकारी खातरजमा करणार आहेत. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सर्व माहिती व परिस्थितीबाबत लेखी निवेदन शपथपत्रासह नागपूर शहराच्या तहसील कार्यालयात खोली क्रमांक एकमध्ये २४ मार्चला किंवा त्यापूर्वी सादर करावी, असे आवाहन नागपूर शहरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय दैने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Story img Loader