लोणार तालुक्यातील वढव येथील इंदिरा आवास योजनेची मंजूर झालेली घरकुले ही निवड केलेल्या लाभार्थीना न देता सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर कागदोपत्री झाल्याचे दाखवून घरकुलाचा निधी हडप केला असून, या प्रकरणाची सखोर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सत्यभान इंगोले यांच्यासह अनेक लाभार्थीनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत वढव येथे १९९६ मध्ये ग्रामपंचायतने ठराव घेऊन गावातील ४० नागरिकांची निवड केली होती, परंतु ग्रामसेवक व सरपंचांनी ठरावानुसार मंजूर झालेल्या लाभार्थीना न देता कागदोपत्री वाटप झाल्याचे दाखवून शासनाकडून आलेली रक्कम हडपल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी राजीव गांधी आवास योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समितीकडे अर्ज दाखल केले होते. मात्र, नागरिकांनी यापूर्वी इंदिरा गांधी आवास योजनेचा लाभ १९९६ मध्ये घेतल्याची नोंद पंचायत समितीत असल्यामुळे त्यांना पुन्हा घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात या लाभार्थीना मात्र घरकुल मिळालेच नाही. यावरून १९९६ मधील घरकुल योजनेचे पैसे सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांनी परस्पर हडपल्याचे उघड झाले असून याबाबत बबन राजुगरू, सत्यभान इंगोले, हरिदास राजगुरू यांच्यासह अनेक लाभार्थीनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader