शालेय पोषण आहारात मोठय़ा प्रमाणावर किडे आढळून आल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव (तुकाराम) येथे समोर आला. या प्रकरणी तयार केलेली सीडी ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांसह जि. प. च्या अध्यक्षांना दाखवली. ही सीडी पाहून सारेच अवाक झाले. मात्र, या बाबत कोणतीही कारवाई अजून झाली नाही.
जिल्ह्य़ातील माध्यमिक व प्राथमिक शाळांसोबतच अंगणवाडीचा पोषण आहार शिजविला जातो. मात्र, या आहारात पाल, किडे आदी आढळून आले. सदोष आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पोषण आहाराचे धान्य व साहित्य एकाच कंत्राटदाराकडून पुरविले जाते. मात्र, हे पुरविले जात असलेले धान्य प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते. या प्रकाराकडे अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठांकडे तक्रारी करून लक्ष वेधले. मात्र, अजून तरी गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.
येथील रुक्मिणी विद्यालयातील पोषण आहाराचा मुद्दा जि. प. च्या बैठकीत चांगलाच गाजला. मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्तावही संमत झाला. मात्र, या बाबतही कारवाई झाली नाही. निकृष्ट पोषण आहाराच्या धान्यात वरिष्ठ लक्ष घालत नाहीत. त्यामुळेच हे सगळे घडत असल्याचे बोलले जाते. येहळेगाव (तुकाराम) येथील अंगणवाडीत शिजविण्यात येणाऱ्या पोषण आहारात मोठय़ा प्रमाणात किडे आढळून येताच गावातील काही जागरूक ग्रामस्थांनी या किडय़ांचे व्हिडिओ रेकॉर्डिग करून जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, ‘सीईओ’ पोपटराव बनसोडे, महिला व बालविकास कल्याण अधिकारी कल्पना क्षीरसागर यांना ही सीडी दाखविली. या प्रकरणी तत्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश अध्यक्षा बोंढारे यांनी दिले असले, तरी पुढील कार्यवाही गुलदस्त्याच आहे.