साथी किशोर पवारांच्या सामाजिक सेवेत निष्काम भाव होता. भगवंताच्या सेवेतच निष्काम वास असतो तद्वत भाई शरीराने जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची प्रेरणा तुम्हा-आम्हास व कामगारांना सतत मिळेल, असे प्रतिपादन नारायणगिरी महाराज देवस्थानचे (सराला बेट) उत्तराधिकारी रामगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील साकरवाडी येथे साथी किशोर पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, सोमैय्या उद्योगसमूहाचे प्रमुख समीर सोमैय्या आदी यावेळी उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मोहनराव चव्हाण, प्रेमानंद रूपवते, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे, अशोक रोहमारे, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न समितीचे किरण ठाकूर, हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस सूर्यकांत बागूल, जिल्हा पत्रकार संघाचे सुरेश रासकर, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे आदींनी साथी पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
शंकरराव कोल्हे म्हणाले, साथी किशोर पवार यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी साकरवाडी होती. त्यांच्यातील संघटना कौशल्याचे गुण रावसाहेब पटवर्धन, मधू दंडवते, एस. एम. जोशी यांनी ओळखले होते. भाईंनी साखर कामगार, शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नांना देशपातळीवर वाचा फोडून आपली ओळख निर्माण केली. साखर कामगारांच्या बोनसच्या प्रश्नावर दरवर्षी त्यांचे आणि माझे भांडण होत असे, हे भांडण तब्बल चाळीस वर्षे झाले. मात्र, त्यांच्या कामगार चळवळींतील नेतृत्वगुण कौशल्यापुढे मला माघार घ्यावी लागत असे.
समीर सोमैय्या म्हणाले, माझे आजोबा, वडील आणि आता मी अशा तीन पिढय़ांचे साथी किशोर पवारांबरोबर संबंध आले. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या जाण्याने कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात हित साधणारा दुवा निखळला आहे.