बहिर्जी नाईक यांच्या अंगी स्वामिनिष्ठा, राष्ट्रप्रेम, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, उत्तम चारित्र्य, शत्रुत्व, चिकाटी, सकारात्मकता अशा विविध गुणांचा सुरेख संगम होता. त्याचा उपयोग स्वराज्य बळकट करण्याकामी झाला. या महापुरूषाच्या कार्याचा आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांनी केले.
बेरड रामोशी समाजाच्या किल्ले बानूरगड येथील बहिर्जी नाईक समाधीस अभिषेक व मानवंदना समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शि. म. जाधव उपस्थित होते.
संभाजीराव भिडे म्हणाले, की युगपुरूष राजा शिवछत्रपती यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे स्वराज्य वाढविण्यासाठी अनेक हिरे कामी आले. शिवरायांच्या अनेक हिऱ्यांपैकी गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक हे एक आहेत. त्यांनी गुप्त बातम्या काढून छत्रपती शिवरायांना पुरविल्यामुळे स्वराज्याचा विस्तार करण्याचा मार्ग सुकर झाला. बहिर्जी नाईक हे आपल्या सर्वाचे स्फूर्तिस्थान आहे. त्यांच्या समाधीवर छत्र झाले पाहिजे, समाधीची दररोज पूजा झाली पाहिजे तसेच दरवर्षी येथे संमेलन व्हावे रामोशी समाजाने व शासनाने याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
शि. म. जाधव म्हणाले, की किल्ले बानूरगड येथील बहिर्जी नाईकांचे समाधीस्थळ हे आदर्श पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी शासनाने खास निधीची तरतूद करून या स्थळाचा विकास करावा.
दादासाहेब जाधव म्हणाले, की बहिर्जी नाईकांचा वंशवेल किल्ले वसंतगड, तळबीड, म्होप्रे, साकुर्डी, सुपने, बेदलरे या ठिकाणी आहे. शिवारायांनी या प्रत्येक गावात १२ चावर जमीन इनाम दिलेली आहे. बहिर्जी नाईक यांचे आम्ही वंशज असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी रंगराव मदने, सर्जेराव जाधव, जयसिंगराव चव्हाण, डॉ. पांडुरंग पाटोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक प्रकाश नाईक यांनी केले.
रघुनाथ मदने, विलासराव पाटोळे, वसंतराव मंडले, बाळासो मंडले, बाबुराव जाधव, अमोल मंडले, पांडुरग चव्हाण, संतोष मलमे, सुधीर नाईक, शशिकांत मंडले, जगन्नाथ मंडले, दादासाहेब बोडरे, गुंगा मंडले, भीमराव माने, आबासो मंडले, उत्तमराव मलमे, मच्छिंद्र मलमे, भगवान पाटोळे, शिवाजीराव गुजले, सुनील मंडले यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील समाजबांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
बहिर्जी नाईक यांचे स्वराज्य कार्य प्रेरणादायी – भिडे गुरुजी
बहिर्जी नाईक यांच्या अंगी स्वामिनिष्ठा, राष्ट्रप्रेम, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, उत्तम चारित्र्य, शत्रुत्व, चिकाटी, सकारात्मकता अशा विविध गुणांचा सुरेख संगम होता.
आणखी वाचा
First published on: 24-08-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspiring contribution of bahirji naik bhide