ठाणे, कॅन्सरग्रस्तांना आर्थिक, मानसिक पाठबळ, आहारविषयक सल्ले देण्याच्या हेतूने ठाण्यातील सात कॅन्सरग्रस्त व या आजारातून बाहेर पडलेल्या महिलांनी एकत्र येऊन, ‘अनुभूती’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत कॅन्सरग्रस्त रूग्ण व त्याच्या कुटुंबियांना मोफत समुपदेशन करून, त्यांना मानसिक पाठबळ देण्याचे काम डॉ. अपर्णा केळकर, भावना वैशंपायन, निलिमा मेहता, अजया दळवी, अमृता सप्रे, संगीत गुप्ता आणि शितल मुळीक या सात जणी करीत आहेत. विशेष म्हणजे या पैकी काही जणी कॅन्सर या आजारातून बाहेर पडल्या आहेत तर काहीजणी उपचार घेत आहेत.
ज्यांच्या पुढाकाराने ही संस्था सुरू झाली त्या डॉ. अपर्णा केळकर यांनी सांगितले की, मी पूर्वी एक डॉक्टर म्हणून लोकांना कॅन्सरविषयी समुपदेशन करीत होते. परंतु जेव्हा मला स्वत:ला कॅन्सर असल्याचे माहील झाले, तेव्हा ज्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेतून गेले, तेव्हाच मला कॅन्सरविषयी अज्ञान असलेल्या कॅन्सरग्रस्तांना याविषयी अधिकाधिक माहिती करून देण्याची आवश्यकता भासली. आणि त्यातूनच डॉ. शुभा थत्ते यांच्या मार्गदर्शनातून ‘अनुभूती’ची स्थापना झाली. मग ओळखीच्या कॅन्सरग्रस्त व सामाजिक कामात रस असलेल्या महिला माझ्याकडे आल्या आणि संस्थेचं काम अधिक विस्तारलं गेलं. या संस्थेतर्फे आम्ही कॅन्सरग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना किमो थेरपी, त्याचे शरीरावर व मानवर होणारे परिणाम, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, याची माहिती रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना आम्ही देतो. तसेच कॅन्सरवरील उपचारांसाठी आर्थिक मदत कुठे उपलब्ध होईल, आहार, अन्य उपचार पद्धती यांची माहिती देतो. तसेच कुटुंबिानेही कॅन्सरग्रस्तांना कशाप्रकारे मदत करावी, याविषयी समुपदेशन करतो.
कॅन्सरग्रस्तांनी अधिकाधिक सकारात्मक पद्धतीने विचार करून कॅन्सर या आजारामधून बाहेर यावे, हीच आमची यामागची मुख्य भूमिका असल्याचे, कॅन्सर होऊनही गेली दहा वर्षे उत्तम आयुष्य जगणाऱ्या भावना वैशंपायन यांनी सांगितले.
‘अनुभूती’ची मुख्य भूमिका ही कॅन्सरग्रस्ताना सपोर्ट ग्रुप हीच असल्याचे नमूद करताना निलिमा मेहता म्हणाल्या की, समुपदेशनासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे आकारत नाही. हे समुपदेशन मोफत केले जाते. आम्ही कशा प्रकारे कॅन्सरवर मात केली, हे आमच्या प्रत्यक्ष अनुभवातून लोकांना सांगतो आणि त्याचा फायदाही होतो. अधिकाधिक लोकांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी ‘अनुभूती’ मागची अपेक्षा असल्याचे डॉ. केळकर सांगतात.
‘अनुभूती’चे काम पाहून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘आयपीएच’ मध्ये आमच्या संस्थेला समुपदेशनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे.
कॅन्सरग्रस्तांना महिलांच्या ‘अनुभूती’चे पाठबळ
ठाणे, कॅन्सरग्रस्तांना आर्थिक, मानसिक पाठबळ, आहारविषयक सल्ले देण्याच्या हेतूने ठाण्यातील सात कॅन्सरग्रस्त व या आजारातून बाहेर पडलेल्या महिलांनी एकत्र येऊन, ‘अनुभूती’ ही संस्था स्थापन केली आहे.

First published on: 01-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Institute supporting cancer victims womens