उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गावी जाण्यासाठी आतुरलेल्या कोकणवासीयांना अपुऱ्या गाडय़ांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांना उपयुक्त ठरेल, अशी अतिरिक्त सेवा मिळणे कोकण रेल्वेकडून अपेक्षित असताना प्रवाशांच्या पदरी निराशाच पडू लागली आहे. गणेशोत्सवाप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असते. तुलनेने गाडय़ा वाढविल्या जात नाहीत, अशा तक्रारी आहे. ठाणे स्थानकात कोकण रेल्वेच्या गाडय़ांना पाचव्या क्रमांकाच्या फलाटावर थांबा देण्यात येतो. या फलाटावर प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून दररोज गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या फलाटावर कोकण रेल्वेची गाडी पकडणे म्हणजे मोठे दिव्य ठरू लागले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांना वाढीव सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. असे असताना कोकण रेल्वे प्रशासनाकडून दादर-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी या दररोजच्या केवळ दोन प्रवासी गाडय़ा वगळल्यास नियमित फे ऱ्यांची पाटी कोरीच आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दक्षिणेत जाणाऱ्या सरासरी दहा गाडय़ा असून त्यामधून क्षमतेपेक्षा चार ते पाच पट अधिक प्रवासी प्रवास करत आहेत, अशी तक्रार प्रवाशी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटनांनी आग्रही भूमिका घेतली आहे. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या वतीने याप्रकरणी ठाणे स्थानकातील गैरसोईचा पाढा नुकताच रेल्वे प्रशासनासमोर वाचण्यात आला. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ५ हा लोकल आणि मेल एक्स्प्रेसच्या जलद वाहतुकीसाठी वापरला जात असून या फलाटावर मोठी गर्दी उसळते. प्रामुख्याने मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, मुंबई-मैंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि दादर तेरुवल्ली एक्स्प्रेस या गाडय़ा ठाण्यातील फलाट क्रमांक ५ वर येतात. उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपट्ट होते आणि हा फलाट गर्दीने फुलून जातो. त्यामुळे कोकणातील गाडय़ांमध्ये चढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. कोकणात जाणाऱ्या सर्व गाडय़ा फलाट क्रमांक ७ वरून सुटल्यास प्रवाशांना होणारा गर्दीचा त्रास टाळता येऊ शकतो, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा