अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जोडीदाराची विवेकी निवड विशेष संदर्भात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह यांची राज्यव्यापी परिषद २ व ३ फेब्रुवारी रोजी लातूर येथे मुक्ताई मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती, संयोजन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर गोमारे यांनी दिली.
शनिवारी (दि. २) सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अपर्णा वेलणकर, डॉ. विजय सुरासे, तर अध्यक्षस्थानी प्रा. पुष्पा भावे राहणार आहेत. रविवारी (दि. ३) दुपारी १ वाजता अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद पानसरे, नाटय़ सिनेकलावंत नंदू माधव, प्रा. डॉ. डी. डी. पवार उपस्थित राहणार आहेत.
खासदार डॉ. जे. एम. वाघमारे परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेच्या दोन्ही सत्रांत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावलेल्यांचे अनुभवकथन होणार आहे. ‘विवाह समस्या व उपाय’ या परिसंवादात या कार्यात अनेक वर्षे असलेले विलास वाघ, सुभाष वारे, मनीषा गुप्ते आपले विचार मांडणार आहेत. परिषदेला जवळपास १ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे अंनिसचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्राचार्य अनिरुद्ध जाधव, दिलीप आरळीकर, माधव बावगे, रामकुमार रायवाडीकर, सुनीता आरळीकर आदी या वेळी उपस्थित होते.