भारताला भूक, गरिबी आणि भ्रष्टाचार यांच्या विषारी पाशातून सोडवायचे असेल तर आंतरधर्मीय सहकार्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन धर्म भारती मिशनचे संस्थापक आचार्य गुरू स्वामी सच्चिदानंद भारती यांनी केले.
धर्म भारती मिशन व गोंदिया शिक्षण संस्थेच्या पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसंवर्धन हेतू आंतरधर्मीय सहकार्य’ या विषयावर आयोजित एकदिवसीय परिषदेत ते बोलत होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एम. भांडारकर यांनी केले. या परिषदेत बोलताना या धर्मातील सर्वसमावेशकपणावर आणि सहिष्णुतेवर श्रीरामकृष्ण मिशन नागपूरचे स्वामी विपाप्यानंद यांनी प्रकाश टाकला. ख्रिश्चन धर्मातील सहृदयता, उदारपणा आणि क्षमाशीलता या वैशिष्टय़ांचा उपयोग राष्ट्रसंवर्धनासाठी निश्चितपणे करून घेता येईल, असे विचार ख्रिश्चन धर्माविषयी बोलताना काटोल येथील प्रा. जे. के. मसीह यांनी मांडले. इस्लामिकविषयी बोलताना नागपूर येथील अब्दुल गफुर पारेख म्हणाले की, इस्लामचा अर्थ शांतीचा धर्म असाच होतो. कोणत्याही प्रकारची िहसा, चारित्रहीनता इत्यादी बाबींचा इस्लाम धर्मात निषेध करण्यात आला आहे. पाप की कमाई, अर्थात, भ्रष्टाचारास इस्लामचा सख्त विरोध आहे. इमान डगमगले तरच मनुष्य भ्रष्टाचारी होतो म्हणून इस्लाममध्ये इमानदारीस अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असल्याचेही त्यांनी सांगितले.  
गोंदिया येथील नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व गोंदिया नगर परिषदेचे माजी अध्यक्ष के. बी. चव्हाण यांनी बौद्ध धर्मातील पंचशील, अष्टांग मार्ग इत्यादी तत्त्वांचे महत्त्व विषद करून बौद्ध धर्मामध्ये जात-पात, अंधश्रद्धा यांना थारा नसल्याचे आवर्जून सांगितले. राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय एकात्मता व राष्ट्र संवर्धनासाठी बौद्ध धर्मातील तत्त्वांची उपयुक्तता त्यांनी विशद केली. या परिषदेचे अध्यक्षपद नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी धर्म भारती मिशनच्या रचनेविषयी व कार्याविषयी विस्तृत माहिती दिली. प्रत्येक धर्माचे अंतिम ध्येय मनुष्य कल्याण हेच असल्यामुळे माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ या निर्थक वादात न पडता प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले तर देश नवनिर्मितेच्या मार्गावर अग्रेसर होईल, असा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडला. परिषदेचे संचालन प्रा. अजय गुप्ता यांनी तर आभार डॉ. बी.आर. शर्मा यांनी मानले. या कार्यक्रमासाठी धर्मभारती मिशनचे सचिव विजय दक्षिणदास व मनोहरभाई पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. राठौर, जीईएस डीटीएड कॉलेजच्या प्राचार्य वैष्णव व कर्मचारी, डीटीएडचे विभाग प्रमुख प्रा. ओ.पी. खंगार तसेच विद्यार्थी, प्राध्यापक व इतर मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.