भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष व नगर शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम उद्यापासून (गुरुवार) सुरू होत आहे. नगर शहराची निवडणूक ३ मे ला दुपारी ४ वाजता होणार असून त्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याने चांगलीच स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेतील सत्तेत सहभाग व माजी केंद्रीयमंत्री असलेले खासदार शहरात असूनही पक्षाचे शहरातील अस्तित्व गटबाजीमुळे क्षीण झाले आहे. अनेक जुने कार्यकर्ते या गटबाजीमुळे कोणाचाच शिक्का मारून घ्यायला नको या विचाराने पक्षापासून दुरावले आहेत. खासदार गांधी एकीकडे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर एकीकडे व या दोघांबरोबरही फटकून वागत आपला तिसराच गट तयार करणारे विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे एकीकडे अशी फाटाफूट झाली आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे शहराध्यक्षपद मिळावे यासाठी सत्तेच्या वर्तुळात असणारे अनेकजण पुढे सरसावले आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विद्यमान अध्यक्ष गंधे यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची थेट मुंबईत जाऊन भेट घेतली. गांधी गटाचे इच्छुक अनिल गट्टाणी यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांची परळीला जाऊन भेट घेतली तर जगन्नाथ निंबाळकर, सुनील रामदासी, अनंत जोशी असे आणखी काही इच्छुक येथेच गांधी, आगरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांना भेटून वर्णी लावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
गटबाजीमुळेच शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख एकदा बदलावी लागली. आताही वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे. माजी जिल्हाध्यक्ष ढाकणे हे संघटनात्मक निवडणुकांचे मुख्य निरीक्षक असून अतुल सावे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पक्षाकडून नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा सदस्य नोंदणी प्रमुख भानुदास बेरड यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार उद्या (गुरुवार) नेवासे, श्रीरामपूर शहर व ग्रामीण, शुक्रवारी (दि.२६) नगर ग्रामीण व राहुरी, शनिवारी (दि.२७) संगमनेर शहर, रविवारी (दि.२८) जामखेड, सोमवारी (दि.२९) पारनेर, मंगळवारी (दि.३०) पाथर्डी, शेवगाव, बुधवारी (दि.१) कर्जत व शुक्रवारी (दि.३) नगर शहराची निवडणूक होईल.

Story img Loader