पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रोझोन मॉलमधील सत्यम सिनेप्लेक्स येथे या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होईल. पुणे फिल्म फाऊंडेशन, प्रोझोन, इंडय़ुरन्स व सारा बिल्डर यांचाही या स्पर्धेच्या आयोजनात सहभाग आहे. नाथ ग्रुपच्या वतीने महोत्सवाचे आयोजन केले आहे.  
शैक्षणिक, ग्रामीण विकास व कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाथ ग्रुपचे शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीत महत्त्वाचे योगदान राहिले आहे. कलेची आसक्ती, अभिरुची यांची जोपासना व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाथ ग्रुपचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी दिली. महोत्सवाच्या प्रवेशिका सत्यम सिनेप्लेक्स, प्रोझोन मॉल येथे उपलब्ध आहेत. रसिकांनी महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन समन्वयक उल्हास गवळी, अनिल इरावणे, सतीश कागलीवाल, आकाश कागलीवाल, सीताराम अग्रवाल, नवीन बगडिया, संतोष उणेचा आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader