‘वळू’, ‘देऊळ’ अशा चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर उमेश कुलकर्णी ‘मसाला’द्वारे निर्मात्याच्या भूमिकेत मराठी प्रेक्षकांसमोर आले. आता आणखी एकदा लेखन-दिग्दर्शनाची संधी निखिल महाजन यांना देऊन ‘अरभाट निर्मिती’ या आपल्या संस्थेद्वारे उमेश कुलकर्णी आणि अभिनेता-लेखक गिरीश कुलकर्णी असे दोघेही निर्माते म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्ससोबत त्यांनी निर्मिलेला ‘पुणे ५२’ हा मराठी रहस्यपट अखेर १८ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे.
ग्राहकांच्या आयुष्यातील गूढाची उकल करून दाखविण्याचे कौशल्य असलेल्या खासगी गुप्तहेराच्याच आयुष्यात झालेल्या बदलांमुळे निर्माण झालेले गूढ या विषयावर ‘पुणे५२’ हा चित्रपट बेतला आहे. मराठी चित्रपटांत गूढरम्य किंवा रहस्यमयपटांची संख्या खूप कमी आहे. आता बऱ्याच कालावधीनंतर मराठीमध्ये रहस्यपट येत आहे. गिरीश कुलकर्णी हेच प्रमुख भूमिकेत झळकणार असले तरी चित्रपटाची तांत्रिक अंगे आंतरराष्ट्रीय स्तराच्या तंत्रज्ञ या चित्रपटात एकत्र आले आहेत. लेखक-दिग्दर्शक निखिल महाजन ऑस्ट्रेलियातील चित्रपट शाळेचे प्रशिक्षित असून ‘पुणे५२’ चे छायालेखन न्यूझीलंडच्या जेरेमी रिगन यांनी केले आहे. तर रहस्यपटांच्या परिणामकारकतेत महत्त्वाचे अंग ठरणारे पाश्र्वसंगीत कोरियाचे संगीत दिग्दर्शक ‘ाूनजंग शिन यांनी केले आहे. त्या अर्थाने मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांच्या कौशल्याची झळाळी मिळाली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह सई ताम्हणकर, किरण करमरकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर बॉलीवूडचे आघाडीचे गीतकार स्वानंद किरकिरे ‘पुणे५२’ मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट १२ डिसेंबर रोजी १२.१२.१२ हा योग साधत प्रदर्शित केला जाणार होता. परंतु, आता १८ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा