जिल्ह्य़ात गेल्या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या दिवशी वैजापूर तालुक्यात आघूर व औरंगाबाद तालुक्यातील हिरापूरवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्य़ातील मकनपूर येथील युसूफ नूर मोहंमद खान (वय ४०) व जिशान ऊर्फ रोहीत कुर्बान (वय २९) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या गुन्हेगाराच्या टोळीने अलिगढ येथील वकिलाचा खून केल्याची कबुलीही दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर वाढी येथे लक्ष्मीपूजना दिवशी ८-१० दरोडेखोरांनी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान शिवसिंग दलसिंग बिघोत यांच्या शेतवस्तीवर हल्ला केला होता. जबर मारहाण करून घरातील व्यक्तींना जखमी केले होते. महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कमही पळविली होती. या दरोडय़ात १ लाख १२ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी वैजापूर तालुक्यातील आघूर शिवारात शाम गिरिजाराम काहिटे व रोटेगाव येथील जगन्नाथदादा बनाळ यांच्या वस्तीवरील घरात दरोडेखोरांनी मारहाण करून ८९ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. चिकलठाणा व वैजापूर येथे गुन्हे दाखल झाले होते. ऐन दिवाळीत पडलेल्या या दरोडय़ाने घबराटीचे वातावरण होते. ही घटना १४ व १५ नोव्हेंबर २०१२ रोजी घडली होती. त्या दिवसापासून तब्बल १३ महिने गुन्हेगारांचा शोध सुरू होता. गुन्हा करतेवेळी वापरलेली भाषा व लकब लक्षात घेऊन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचा माग काढला. पोलीस अधीक्षक ईश सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक प्रमुख सतीश वाघ, मधुकर मोरे, संजय जगताप यांसह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Story img Loader