‘जाने तू..या जाने ना’ चित्रपटातून तो दिसला तेव्हा अभिनेता आमिर खानचा भाचा हीच त्याची पहिली ओळख होती. पहिल्याच चित्रपटात त्याला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. त्याच्याबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या. पण, त्यानंतर आलेले त्याचे दोन चित्रपट ज्या वेगाने फ्लॉप झाले त्याच वेगाने लोकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही विरल्या. आता मिलन ल्युथारिया दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटातही इम्रान आजवरच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळ्या अवतारात दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याचा चित्रपट निवडीचा दृष्टिकोण, यश-अपयशाची गणितं, आजोबा नासिर यांच्याबद्दलच्या आठवणी अशा अनेक गोष्टींवर त्याच्याशी मारलेल्या गप्पा..
‘कधी ना कधीतरी मी दिग्दर्शक होणारच..’ इम्रानच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर त्याचा मामा आमिर किंवा त्याच्या समकालीन अभिनेत्यांना जसं कधी निर्माता कधी दिग्दर्शक व्हायची स्वप्ने पडतात तसंच हाही बोलून गेला असावा, असा विचार आपल्या मनात सुरू होतो. पण, त्याचं पुढचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र आपल्याला कळून चुकतं की त्याच्या बोलण्यात काही एक तथ्य जरूर आहे. मला मुळात दिग्दर्शकच व्हायचं होतं, पटकथाकार व्हायचं होतं. म्हणून मी त्याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षणही घेतलं. उलट, अभिनयाचं प्रशिक्षण मी कधीच घेतलं नव्हतं. त्यामुळे जे मी शिकलो ते आजमावण्याची इच्छा मनात असणारच. आता अभिनेता म्हणून जगताना आयुष्य इतकं घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे टिकटिक करत पळणारं झालंय की पटकथा लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी मनात असूनही त्यांना वेळ देता येत नाही. पण, एका ठराविक वेळेनंतर या गोष्टी मी नक्की जुळवून आणणार, असे इम्रान सांगतो.
बॉलिवूडच्या मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा, निर्माता-दिग्दर्शक नासिर हुसैन यांचा नातू इम्रान खान याच्या घरातच चित्रपटाचा वारसा आहे. चित्रपट वर्तुळातील प्रतिष्ठित घरात तो वाढला असला तरी लहानपणापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या उलथापालथीमुळे त्याची जडणघडण वेगळ्याच मुशीत झाली आहे. आणि तरीही आपल्यावर आपले आजोबा नासिर हुसैन यांचाच प्रभाव आहे, हेही तो कबूल करतो. इम्रानची आई नुझत खान आणि वडील अनिल पाल यांचा घटस्फोट झाला तेव्हा इम्रान दीड वर्षांचा होता. तेव्हापासून इम्रान आपल्या आजोबांकडे नासिर हुसैन यांच्या घरात लहानाचा मोठा झाला. २४ पाली हिलवरचा नासिर हुसैन यांचा प्रसिध्द बंगला ही त्याच्यासाठी अनमोल ठेव आहे. त्यामुळे अभिनेता म्हणून अगदी पहिल्या काही चित्रपटांमधून जम बसवल्यानंतर इम्रानने पहिल्यांदा आजोबांचा हा बंगला विकत घेतला. हा बंगला आपल्या पध्दतीने सजवून तो आता पत्नी अवंतिका आणि आईसह तिथे रमला आहे. आपण त्याला चित्रपटाच्या यशा-अपयशाबद्दल विचारत असतो. तो मात्र हा बंगला घेणं हीच माझी मोठी कामगिरी होती, असे ठणकावून सांगतो. ‘चित्रपट आपण नेहमीच करत असतो. एक कलाकार म्हणून विविध चित्रपटातून आपली भूमिका उत्तम वठवणं हे माझं कामच आहे. तो चित्रपट यशस्वी ठरेल की नाही ही नंतरची गोष्ट. पण, चित्रपट यशस्वी होईल का, आता हा आपटला तर दुसरा चित्रपट कसा असेल पुन्हा तोही फ्लॉप गेला तर.. अशा सगळ्या विचारांमध्ये अडकून बसणं मला पटत नाही. उलट हा बंगला ही माझ्या क र्तृत्त्वान आजोबांची ऐतिहासिक ठेव आहे. त्यांच्या आणि माझ्या बालपणीच्या कितीतरी आठवणी इथे पावलापावलावर लपलेल्या आहेत. त्यामुळे हे घर मिळवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं’, असं इम्रान सांगतो.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या सिक्वलपटात तो काम करतो आहे. तरीही लोकं सिक्वल का करतात हा मोठा प्रश्न आपल्याला पडला आहे, असे त्याने सांगितले. ‘वन्स अपॉन..’ची पटकथा मला ऐकवली गेली तेव्हा सिक्वल म्हणून मी या चित्रपटाकडे पाहिलेच नाही. पहिल्या चित्रपटाता सुलतानला मारून शोएब मुंबईचं अंडरवर्ल्ड ताब्यात घेतो. या चित्रपटात शोएबला हे करून दहा वर्ष लोटली आहेत. इथे मी त्याचा सगळ्यात जवळचा माणूस.. शोएबच्या भाषेत सांगायचं तर त्याचा ‘शेर’ असलेल्या अस्लमची भूमिका करतो आहे. अस्लमच्या आयुष्यात एक तरूणी येते. तो तिच्यावर प्रेम करू लागतो आणि नेमकी शोएबलाही त्याचं प्रेम याच तरूणीत गवसतं. हा तिढा जिथे निर्माण होतो तिथे त्यातल्या व्यक्तिरेखांमधील भावनिक नाटय़ाला सुरूवात होते. हे नाटय़ मला जास्त आव्हानात्मक वाटलं म्हणून हा चित्रपट स्वीकारल्याचे इम्रानने सांगितले. इम्रानने याआधी ‘लक’ आणि ‘किडनॅप’ चित्रपटात थेट संजय दत्तच्या तोडीस तोस अभिनय केला होता. आता तो अक्षय कु मारलाही या चित्रपटात तशीच ठसन देणार आहे. तुला असे साद-प्रतिसादवाले चित्रपट फार आवडतात का?.. असं विचारल्यावर ‘यातच तर खरी मजा आहे’, असं अगदी खुशीत येऊन तो सांगतो.  चित्रपट निवडताना, पटकथा ऐकताना मी कधीही प्रेक्षक काय विचार करतील हे बघतो आणि त्यानुसार चित्रपटाची निवड करतो.  एकंदरीतच चांगला अभिनय हा त्याचा ध्यास आहे आणि घरच्यांचं प्रेम हा त्याचा श्वास आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही.

Story img Loader