किती बदललं गाव आता
गाव आता गावात राहिलं नाही
धड खेंडंही उरलं नाही
अन् शहरही झालं नाही
ही गावाबद्दलची ओढ आणि आज त्यात झालेला बदल सार्थ शब्दांमध्ये मांडणारा तरुण कवी जेव्हां
कोठवर करावेत पाढे पाठ
संयम आणि सहनशीलतेचे
कुणाकुणाच्या वाहाव्यात पालख्या
खांद्याची सालपटं निघेपर्यंत
कामगारांचे दु:ख नेमकेपणाने मांडतो. तेव्हां तो किरण भावसार शिवाय दुसरा कोणी नसतो. कधी काळी बातमीदार असलेला हा सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील भूमिपूत्र स्वत:च त्याच्या प्रामाणिक निर्विवाद यशामुळे बातमीचा विषय ठरतो.सहित्याच्या प्रांतात नाव मिळवतो याचे ‘कवतूक’ शब्दातही मावत नाही. किरण भावसारला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मानाचा विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आणि सर्वत्र एका प्रामाणिक, साध्यासरळ आणि प्रतिभावान कविचा गौरव झाल्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. ‘मुळावरची माती सांभाळताना’ हा अस्सल ग्रामीण मातीचा परिसस्पर्श झालेल्या किरणच्या काव्यसंग्रहाने विशाखा पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये किरणला नेऊन बसविले. ही बाब या कविला घडवणाऱ्या वडांगळीच्या मातीचाही यथार्थ सन्मान करणारी ठरावी.
लहानपणी गरिबीचे चटके सोसणारा आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच्या कारणामुळे तडजोड करणारा हा कवी या वयातही एखाद्या गुणी, आज्ञाधारक व नम्र मुलासारखा सर्वाशी प्रेमाने, आदराने वागताना दिसतो तेव्हा त्यांच्यातील ‘मोठेपण’ अधिकच उठून दिसते. किरणचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करीत. घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. या प्रतिकूल परिस्थितीतही किरणने गुणवंत, ज्ञानवंत होण्याचे स्वप्न पाहिले. निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धांमधून वडांगळीसारख्या ग्रामीण भागातून आपल्या व्यक्तीमत्वाला विविधांगी पैलू पाडण्याची धडपड केली. शाळा शिकता शिकता वडिलांना व्यवसायात हातभार लावता यावा म्हणून किरण व त्याचे भाऊ तळमळीने, निष्ठेने रात्रीचा दिवस करीत. दिवाळीत इतर मुले फटाके फोडत असताना किरण कपडे शिवण्यात, काजे बटन करण्यात रमलेला असायचा. किरणला शिक्षक किंवा प्राध्यापक व्हायचे होते पण आर्थिक परिस्थिती आड आली.
‘लवकरात लवकर मुलाने कामधंद्याला लागावें’ या वडिलांच्या इच्छेमुळे किरणने पटकन काम मिळण्याची खात्री असलेल्या आयटीआयचा रस्ता धरला. वडांगळीतून सिन्नरला आलेल्या किरणच्या आयुष्याचा मार्गच या नव्या प्रवासाने बदलून टाकला. मुलाने लवकर हाताशी यावे या वडिलांच्या अपेक्षेला एका आज्ञाधारक मुलाने चार चाँद लावले, पण ते स्वत:च्या इच्छांना मूरड घालून. आयटीआय शिकताना व त्यानंतर सिन्नरच्या इन्झाईन्स कंपनीत नोकरी करताना यंत्राच्या सानिध्यात, उत्पादन वितरण, जमाखर्चाच्या वातावरणात त्याने त्याच्यातील संवेदनशील मनाचा, मातीशी नाळ जुळालेला कवी जिंवत ठेवला. खासगी कंपनीत सतत अस्थैर्याची टांगती तलवार डोक्यावर बाळगून, परिस्थितीशी संघर्ष करीत किरण लिहित राहिला. विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर या गुणग्राहक कवी मित्रांनी नवख्या, साध्याभोळ्या किरणला नाशिकच्या साहित्य प्रांतात आणले. किरणने या संधीचे अक्षरश: सोने केले. कवी खलील मोमीन यांच्या मार्गदर्शनाने किरणची कविता अधिकच उजळून निघाली. त्याचे दु:ख, त्याच्या वेदना, त्यांची सामाजिक जाणीव यांचे प्रतिबिंब कवितेत उमटले. ग्रामीण मातीतल्या, शेतातल्या जगण्याशी नातं सांगणाऱ्या प्रतिमांची ‘मांदियाळी’ किरणच्या कवितेतून दिसू लागली आणि पहाता पहाता यंत्राच्या गराडय़ातला, मॅकेनिक म्हणून भूमिका बजावणारा, कधी काळी शिवणकामात बुडालेला किरण सार्वजनिक वाचनालयाच्या प्रतिष्ठेच्या कवी गोविंद काव्य पुरस्काराचा मानक२ी झाला.
विजयकुमार मिठेंसारख्या जाणकार कवी-प्रकाशकाने ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा किरणचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. याच काव्यसंग्रहाला संगमनेरचा कवी आनंद फंदी, तसेच अलीकडे नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचा मानाचा विशाखा पुरस्कार जाहीर झाला. किरणच्या अथक परीश्रमाची ही पावती म्हणावी लागेल.
घराचे हप्ते फेडण्याचे काम सुरू असतानाच पुस्तकाचा खर्च पेलवण्यासारखा नव्हता. पण सर्व काही छान जमून आलं. बायकोने दागिन्याचा हट्ट धरला नाही पण ‘तुमचं पुस्तक आलं पाहिजे’ म्हणून सारखं मागे लागली. हे सांगताना किरणला गहिवरून येते.
‘मी नंतरच्या काळात सतरा क्रमांकाचा फॉर्म भरून बारावी झालो. नंतर मराठी साहित्याच्या प्रेमापोटी एमए मराठीही केलें. पण शिक्षक काही घेता आले नाही. मी अडचणीत असताना, भविष्याची चिंता सतावत असताना कविताच माझी सखी झाली. अश्रू पुसण्याचा धीर, नवी उमेद कवितेनेच माझ्यात पेरली’ असे किरण सांगतो. ई साहित्य प्रतिष्ठानने किरणला व त्याच्या कवितेला जगभरात नावलौकिक मिळवून दिला. त्याची तीन पुस्तके ‘ई बूक’ म्हणून जगातील अनेक देशात जाऊन पोहचली आहेत. अगदी कॅलिफोर्निया, इंग्लंड आणि विविध देशांतून किरणच्या कवितेवर ई मेल व्दारे प्रतिक्रिया येत आहेत. अस्सल गावरान वास आणि घामाची ओल असणाऱ्या किरणच्या कवितांचा सर्वत्र गौरव होत आहे. अंतरी ओलावा असल्याशिवाय डोळ्यात पाणी येत नाही हे खरं आहे म्हणूनच किरणची कविता भावते, काळजाला भिडते. जणू आपलेच दु:ख कोणी मांडत असल्यासारखे वाटल्याने ती आपलीच होऊन जाते. हेच त्याचे वेगळेपण आहे.
येणाऱ्या जाणाऱ्याच्या स्वागतासाठी त्याची कविता आणि त्याचं माणूसपण ल्यालेलं छोटंसं देखणं घर सदैव सज्ज आहे. काव्य क्षेत्रात हा ‘आशेचा किरण’ वडांगळीसह संपूर्ण जिल्ह्य़ाचे भूषण ठरेल यात शंका नसावी.