महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रथम इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नंतरच शिवसेनेबरोबर जागा वाटपाची चर्चा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या निवडणुक समितीने घेतला आहे. त्यासाठी भाजपकडील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी (दि. ३०) व गुरुवारी (दि. ३१) पक्ष कार्यालयात होणार आहेत.
मनपा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने खासदार दिलिप गांधी, आ. राम शिंदे, आ. शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे व शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीची बैठक आज झाली. त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आगरकर यांनी दिली.
सेनेबरोबरच्या युतीत भाजपने निम्म्या जागांची मागणी केली आहे व या एकुण ३४ जागांसाठी भाजपकडे एकुण १०८ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाचा व त्यासाठी आलेल्या उमेदवारी अर्जाचा समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानुसार प्रभाग १ ते १६ मधील इच्छुकांच्या मुलाखती दि. ३० रोजी व प्रभाग १७ ते ३४ मधील इच्छुकांच्या मुलाखती दि. ३१ रोजी सकाळी १०.३० पासुन शहरातील पक्ष कार्यालयात घेतल्या जातील. या मुलाखतीवेळीच इच्छुकांकडुन प्रभागांची स्थिती, स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडुन माहिती घेऊन नंतरच युतीबाबत जागा वाटपाचा निर्णय तसेच योग्य तो निर्णय समिती घेणार आहे. मुलाखतीसाठी इच्छुकांनी पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन आगरकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा