हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जिल्ह्य़ात काही तरुणांची चौकशी केली. चौकशीत काय हाती लागले याचा अधिकृत तपशील मिळाला नसला, तरी चौकशीची प्रक्रिया शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सुरू होती.
हैदराबादच्या दिलसुखनगर परिसरात बॉम्बस्फोट घडल्यानंतर देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. नांदेड पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्य़ात रात्र रस्त्यावर घालवली. पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, अतिरीक्त अधीक्षक तानाजी चिखले यांनी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांना भेटी देऊन दक्षतेच्या सूचना केल्या. तसेच गुरुद्वारा, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमनतळ यांसह अनेक भागात भेटी देताना तेथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. नांदेडसह भोकर, किनवट, माहूर, देगलूर व अन्य तालुक्यांतल्या सर्व लॉज, उपाहारगृह व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे चिखले यांनी सांगितले.
नांदेड पोलीस रात्रभर गस्त घालत असताना एटीएस पथकाने धर्माबाद, तसेच जुन्या नांदेड शहरात काही तरुणांची चौकशी केली. पुणे-दिल्ली बॉम्बस्फोट व अन्य अतिरेकी कारवायांत सहभागी झालेल्या जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांतील सात तरुणांना पूर्वीच अटक करण्यात आली. बंगलोर पोलिसांनी महमद अक्रम, दिल्ली पोलिसांनी नांदेडचा इमरान खान पठाण व धर्माबादच्या मुकबुल हाजीला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केली. हे तिघेही इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित होते. महाराष्ट्र एटीएसने अतिरेकी कारवायात गुंतलेल्या मोहम्मद मुजम्मील, म. सादीक, म. इलियास व म. इरफान या चौघांना अटक केली. हे सातजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दहशतवादी कारवायांत नांदेडच्या काही तरुणांचा सहभाग आढळल्यानंतर एटीएससह एनआयए, अन्य गुप्तचर यंत्रणा दक्ष झाल्या. एटीएस नांदेड शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री धर्माबाद व जुन्या नांदेड शहरातील काही भाग पिंजून काढत या सातजणांच्या साथीदारांची चौकशी केली. चौकशीची प्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरू होती. दिल्ली पोलिसांनी अटक केलेला स. मकबुल हा कुख्यात अतिरेकी रियाज भटकळ याच्या संपर्कात होता. त्याने हैदराबादच्या काही भागाची रेकी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. हैदराबाद येथे ज्या प्रकारे बॉम्बस्फोट झाला, त्याचे पुणे व दिल्ली बॉम्बस्फोटाशी साधम्र्य आहे. तेथेही अमोनियम नायट्रेटचा वापर झाला होता. हैदराबाद स्फोटातही अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याने स्फोट इंडियन मुजाहिद्दीननेच घडवला असावा, अशी शक्यता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Story img Loader