चिखलीकर प्रकरणाचा धसका घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठांनी आता आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले असून येथील कार्यकाळात गैरव्यवहाराचा आरोप असलेले कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे.
लाच घेतांना सापळय़ात अडकलेले नाशिकचे कार्यकारी अभियंता चिखलीकर यांच्याकडे कोटय़वधीची बेनामी संपत्ती सापडल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग चर्चेत आला आहे. चिखलीकर प्रकरणामुळे या विभागाची बरीच नाचक्की झाली. यातून सुरू झालेल्या आरोपाच्या फैरी थेट बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचल्या. या सर्व प्रकारामुळे धास्तावलेल्या या खात्यातील वरिष्ठांनी आता साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासोबतच गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मोहीम वरिष्ठांनी आता राबवणे सुरू केले आहे. ही मोहीम राबवतांना कार्यकाळ सुद्धा निश्चित करण्यात आला आहे. एक वर्षांपूर्वीपर्यंत येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांच्याविरूद्ध असलेल्या आरोपांची चौकशी आता वेगाने सुरू झाली आहे. मिश्रा यांनी येथे असताना नालीचे बांधकाम करणाऱ्या एका कंत्राटदाराला पूलाचे बांधकाम केले असे बनावट प्रमाणपत्र दिले होते. हा मुद्दा विधीमंडळात सुद्धा गाजला होता. मिश्रा यांनी चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या जाम ते बामणी या मार्गावरील जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम जीवन प्राधिकरणला न देता एका कंत्राटदाराला देऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बांधकाम खात्याकडे असलेला इतर खात्याचा ६ कोटीचा निधी परस्पर वळता करण्याचा आरोप सुद्धा मिश्रा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मिश्रा गोंदियात कार्यरत असताना त्यांनी तेथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करताना बराच उशीर लावला. हे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले तो त्यांचा वर्गमित्र असल्याने जाणीवपूर्वक विलंब लावला. यामुळे शासनाला ५ कोटीचा जास्तीचा खर्च सहन करावा लागला. याशिवाय तेथील शासकीय रूग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच आरोपावरून त्यांची गडचिरोलीत बदली करण्यात आली होती. तेथून येथे रूजू झाल्यावर सुद्धा त्यांच्यावर गैरव्यवहाराचे बरेच आरोप झाल्याने आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे. मिश्रा यांच्यावर वरिष्ठांनी दोषारोपपत्र बजावले असून त्याचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या मिश्रा नव्याने तयार करण्यात आलेल्या सिरोंचा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मिश्रा यांच्याप्रमाणेच आरोप असलेल्या खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत.  आरोप सिद्ध झाले तर एकाही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader