स्वाइन फ्लूसारख्या गंभीर आजाराने जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला आहे. स्वाइन फ्लूने शिरकाव केला असून, आरोग्य विभागाने आरोग्य शिक्षणाची मोहीम राबवून तालुक्यात जनजागृती करावी असे आवाहन पाटण पंचायत समितीच्या सभापती वनिता कारंडे यांनी केले.
पाटण पंचायत समितीतर्फे स्वाइन फ्लूच्या साथीसंदर्भात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. उपसभापती राजाभाऊ शेलार, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांची उपस्थिती होती.
रवींद्र सबनीस म्हणाले, की सार्वजनिक आरोग्य आणि स्वास्थ याबाबी गंभीरपणे घ्यायला हव्यात. प्रतिबंधात्मक उपायायोजना प्रभावीपणे राबवून सामूहिक प्रयत्नातून या संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे. अविनाश फडतरे यांनी समाजात आजाराबाबत गैरसमज निर्माण होऊन भीतीचे वातावरण  निर्माण होणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्नातून सामोरे जाण्याचे आवाहन केले.
राजाभाऊ  शेलार म्हणाले, की जिल्ह्यात आलेले स्वाइन फ्यूचे संकट थोपण्याचे आव्हान आहे. तालुक्यात त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना आजाराबाबत उगाचच दहशत निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ बिघणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
डॉ. दीपक साळुंखे म्हणाले, की २००९ पासून देशात तसेच राज्यात स्वाइन फ्लूने थमान घातले असून, त्या पाश्र्वभूमीवर तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालय, हॉटेल अशा जोखमीच्या ठिकाणी सतर्क राहावे लागेल. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. 

Story img Loader