प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हायटेक करण्याच्या उदात्त हेतूने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अति. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, लेखा अधिकारी, अशा ३२ अधिकाऱ्यांना अॅपल कंपनीचे आयपॅड उपलब्ध करून दिले आहेत. फायली सोडून आता आयपॅडचा वापर करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने सर्व अधिकारी आयपॅड हाताळण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दीड कोटीचा निधी खर्च करून ३२ अधिकाऱ्यांना आयपॅड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे, यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत संगणक लावण्यात आले आहेत. हळूहळू संगणकाची जागा लॅपटॉपने घेतली आहे. त्यामुळे आता बहुतांश वरिष्ठ अधिकारी लॅपटॉप वापरताना दिसतात. मात्र, आता लॅपटॉपची जागा आयपॅडने घेतली आहे. मंत्रालयापासून तर विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आयपॅडवर बहुतांश कामे करतात. त्यामुळे कामकाज अधिक सोपे झाले असून तंत्रज्ञानामुळे कार्यालय हायटेक झाले आहेत.
येथील जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीही कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्ह्य़ातील ३२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयपॅड उपलब्ध करून दिले आहेत. यात १५ तालुक्यांचे तहसीलदार, सहा उपजिल्हाधिकारी, सात उपविभागीय अधिकारी व लेखाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या ३२ अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये आयपॅड खरेदी करण्यासाठी दिले. त्यासाठी सेतूच्या निधीतून १ कोटी ६० लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला येताना यापुढे फाईल किंवा कागदांचा वापर करण्याऐवजी आयपॅडचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश बैठकांना अधिकारी आयपॅडचा वापर करत असल्याचे चित्र बघायला मिळते.
बहुतांश वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्तीला आले असल्याने त्यांना आयपॅडचा वापर करणे कठीण जात आहे. मात्र, अशा अधिकाऱ्यांना आयपॅड हाताळण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश अधिकारी आता आयपॅडचे प्रशिक्षण घेत आहेत. आयपॅडमुळे प्रशासकीय काम अधिक सोपी आणि गतिमान होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांना असल्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय हायटेक करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय फायलींच्या गठ्ठय़ांमध्ये पूर्णपणे दबले गेलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कुठल्याही विभागातील कोणत्याही टेबलवर जा तेथे सर्वत्र फायलींचा गठ्ठा पडलेला दिसतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील हे चित्र बदलण्यासाठी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे काम व्हावे, या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दुसरीकडे आयपॅडमुळे वेळेची बचतही होईल. त्यामुळे ज्याचे काम आहे त्याचा व अधिकाऱ्यांचा वेळही वाचेल ही भावनाही त्यामागे आहे. जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. इंटरनेट, ई-मेल व संगणक याचा वापर तर जास्तीत जास्त करा आणि काम अधिक सोपे करा, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय भवन व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालयांना भेट देऊन संगणकाचा जास्तीत जास्त वापर करण्याची सूचना दिली, तसेच कामकाजात संगणकाचा वापर या शासनाच्या धोरणानुसार महसूल विभाग आधुनिकीकरणांतर्गत जिल्ह्य़ातील सर्व तलाठय़ांना संगणकाचे प्रशिक्षण दिले.
भूमिअभिलेखाचे अद्ययावतीकरण हा या प्रशिक्षणाचा मूळ हेतू असून जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी आशुतोष सलिल यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठय़ांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली. या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्य़ातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना संगणकाविषयी प्राथमिक ज्ञान व संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ई-महाभूमीविषयी माहिती जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सतीश खडसे व जिल्हा प्रकल्प अधिकारी अनिल डोंगरे यांनी सर्वाना माहिती देऊन प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सर्वाना संगणक वापरण्याचे निर्देश देऊन स्वत: मार्गदर्शनही केले.
जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांना फायली गुंडाळून आयपॅड वापरण्याचे निर्देश
प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हायटेक करण्याच्या उदात्त हेतूने जिल्हाधिकारी
First published on: 28-11-2013 at 09:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipad instead files for chandrapur officials