मुंबईसह नवी मुंबई आणि नागपूर येथे झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस संरक्षणापोटी आयोजकांकडून देय असलेला खर्च अद्याप पोलीस खात्याला मिळालेला नाही. याबाबतची देयके पोलीस खात्याने आयपीएल व्यवस्थापनाला दिल्यानंतरही तीन वर्षांची २० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) चे सामने मुंबईतील ब्रेबॉर्न, वानखेडे स्टेडियम व नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियम तसेच नागपूर येथे झाले होते. या सामन्यांसाठी पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली होती आणि त्यासाठी व्यवस्थापनाने बंदोबस्ताचा खर्च पोलीस खात्यास द्यावयाचा होता. २००८, २०१०, २०११ आणि २०१२ या वर्षांमध्ये आयपीएलचे सामने झाले. मुंबईमध्ये मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याअंतर्गत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. २०१० मध्ये झालेल्या सामन्यांच्या बंदोबस्ताचे देयक सामन्याचे व्यवस्थापकीय अधिकारी सुशील जैन यांच्याकडे पाठविण्यात आले होते. तथापि, अद्याप हे देयक मिळाले नसल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी नवी मुंबई भाजपचे सरचिटणीस डॉ. संतोष पाचलग यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याने मुख्यालयाकडे देयक पाठविले असले तरी मुख्यालयाला अद्याप रक्कम मिळाली किंवा नाही हे कळलेले नाही, असेही वरिष्ठ निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलसाठी पोलीस संरक्षण नेमके कोणी पुरविले याबाबतही पोलीस खात्याकडून वेगवेगळी माहिती डॉ. पाचलग यांना देण्यात आली आहे.
नवी मुंबई येथे झालेल्या सामन्यांच्या वेळच्या बंदोबस्ताची सुमारे साडेदहा कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नसून डॉ. पाचलग यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नागपूर येथे झालेल्या सामन्यांच्यावेळी देण्यात आलेल्या बंदोबस्तापोटी नागपूर ग्रामीण पोलिसांना दोन कोटी ३० लाख ३३ हजार ८२० रुपये तर नागपूर शहर पोलिसांना २३ लाख २२ हजार ८२६ रुपये अद्याप मिळालेले नाहीत.    

Story img Loader