अंतर्गत रस्ते प्रकल्पांतर्गत टोल आकारणी करणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी टोप या गावातून पिटाळून लावले. या गावात एका इमारतीत सुमारे १०० कर्मचारी राहत होते. त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांना तत्काळ हाकलून लावले, तर बाकीच्यांना तेथे राहण्यास देऊ नये, असा इशारा घरमालकास दिला.    
टोल आकारणी करणारे कर्मचारी शहरालगत असलेल्या गावांमध्ये राहत आहेत. टोप (ता.हातकणंगले)या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावातील बापू पाटील यांच्या घरामध्ये सुमारे १०० कर्मचारी राहत होते. टोलविरोधात जिल्हभर कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. तर अलीकडे शिवसेनेने आंदोलनात स्वतंत्र बाणा दाखविण्यास सुरूवात केली आहे. युवासेनेच्या वडगाव येथील कार्यकर्त्यांना टोप गावात आयआरबी कंपनीचे कर्मचारी राहत असल्याची माहिती मिळाली. या शिवसैनिकांकडे तेथील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृतीच्या परप्रांतीय कामगारांविषयी तक्रारीही केल्या होत्या.     
या माहितीच्या आधारे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे, चेतन खाडे, सागर पाटील, अनिल चव्हाण,अंकुश माने, चेतन अष्टेकर, योगेश शिंदे, अनिकेत जाधव, साईनाथ शिंदे, आशिष ढाले, अमोर सुर्वे आदी कार्यकर्ते कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी घरमालक बापू पाटील यांना जिल्ह्य़ात टोलविरोधात आंदोलन सुरू असतांना तुम्ही टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यास जागा कशी दिली, कर्मचाऱ्यांची कसलीही ओळख नसतांना त्यांना ठेवून कशाला घेतले, त्यांच्या चारित्र्याची नोंद कशाप्रकारे ठेवली आहे आदी प्रश्न उपस्थित करीत धारेवर धरले. त्यावर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे शिवसैनिकांना सांगितले. त्यावर शिवसैनिकांनी तेथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवून सामानासह त्यांना घरातून पिटाळून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा