बाजारातील मंदीमुळे येथील लोखंड उद्योगातील उत्पादन मोठय़ा प्रमाणात कमी झाले. येथे लोखंडाचे पन्नासपेक्षा अधिक उद्योग असून त्यात बांधकामासाठी लागणाऱ्या सळय़ा, तसेच त्या तयार करण्यास लागणारे प्रक्रियाकृत लोखंड निर्माण केले जाते.
साधारणत: मागील तीन महिन्यांपासून या उद्योगास मंदीचा फटका बसला. गेल्या दीड महिन्यात त्याची तीव्रता अधिक वाढली. जालना शहरातील या उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळपास २५ अब्ज रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. डॉलरच्या तुलनेत झालेले रुपयांचे अवमूल्यन आणि परदेशातून आयात होणाऱ्या भंगाराच्या आयातीत अडचण येत असल्याचा परिणाम या उद्योगांवर झाला आहे. जालना शहरातील या उद्योगांना जेवढा कच्चा माल (भंगार) लागतो, त्यापैकी जवळपास ७५ टक्के बाहेरच्या देशांमधून आयात होतो. आयात कमी तर झाली आहेच, परंतु राज्य व राज्याबाहेर बांधकामास लागणाऱ्या सळय़ांची मागणीही मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या अडीच-तीन महिन्यांत कारखाने निम्म्या क्षमतेने चालविण्यात येत आहेत. कामगारांच्या मजुरीवर, तसेच या उद्योगाशी संबंधित वाहतूक व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे.
दरमहा साधारणपणे ७० ते ८० कोटी रुपये वीजबिलाची आकारणी या उद्योगांकडून महावितरण करते. परंतु गेल्या अडीच-तीन महिन्यांत विजेचा वापरही कमी प्रमाणावर होत आहे. ७० ते ८० कोटींचे वीजबिल अपेक्षित असताना ऑगस्टमध्ये कमी वापरामुळे हा आकडा ४० कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. नेहमीच्या बिलाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत या उद्योगांचे वीजबिल जवळपास एक अब्ज रुपयांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader