भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणूक संपताच कधी न होणारे वीज भारनियमन केले जात असून रात्री-अपरात्री केव्हाही वीज खंडित होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही पाणीपुरवठा जाणीवपूर्वक खंडित केला जात आहे.
मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात सामान्य जनतेला सत्ताधारी सूडबुद्धीचे राजकारण करून त्रास दिला जात आहे. आगामी चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल, असा इशारा भाजपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा भाजपचे नाना पटोले यांनी मोठय़ा फरकाने पराभव केला. सर्वच विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांना भरघोस मते मिळाल्याने आघाडीच्या नेत्यांना हे अपयश जिव्हारी लागले आहे. यामुळे जनतेला सूडबुद्धीने त्रास देण्यासाठी भारनियमन सुरू करण्यात आले असून गोंदियातील अनेक भागात पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही. याचप्रमाणे गेल्या अनेक महिन्यांपूर्वी जिल्ह्य़ातील गरीब जनतेसाठी आरोग्याची सोय व्हावी, या दृष्टीने के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे श्रेय लाटण्यासाठी व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात असल्याने जनतेला या इमारतीचा अद्यापही लाभ मिळू शकला नाही.
तसेच शहरातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी राजकारणात हा पूल अडकला आहे. येथील जनता हे सर्व ओळखत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. गेल्या साडेचार वर्षांत विकासकामे न करता जनतेला त्रास देऊन शहराला मागे नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सिमेंट रस्त्यावरही डांबरीकरण करून आपण किती मोठे विकासपुरुष आहोत, हे दाखवण्याचे काम सत्ताधारी आमदार करीत आहेत. गोंदिया शहराला नंबर १ करण्याचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जनता ओळखून आहे. शहर नंबर १ तर झालेच नाही. मात्र, नेत्यांनी स्वत:ला नंबर १ बनवण्यासाठी चांगलेच परिश्रम घेतल्याचा आरोपही भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केला आहे.