अनेक महिने महिन्यातून फक्त एक दिवस नळाव्दारे पाणीपुरवठा होत असल्याचे दृश्य डोळ्यांमध्ये साठविणाऱ्या मनमाडकरांना अलीकडेच काही दिवसांपासून सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे पाहावयास मिळू लागले. परंतु पालिकेच्या अनियंत्रित वेळापत्रकामुळे कोणत्या वेळेस कुठे पाणी पाणीपुरवठा होईल, याचा थांगपत्ता लागत नसल्याने मनमाडकरांना रात्रही जागून काढावी लागत आहे. पालिकेने सातव्या दिवसाआड कुठे पाणीपुरवठा होईल, याची माहिती एक किंवा दोन दिवस आधी द्यावी आणि एक ते दीड तास पाणी पुरवठा करण्याची मागणी मनमाडकरांकडून होत आहे.
यंदा जानेवारीपासूनच शहराची टंचाई अतिशय तीव्र झाली. यादरम्यान एकदा तर तब्बल ५५ दिवस नळ पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यानंतर महिन्यातून एकदा पाणी मिळू लागले. सहनशील मनमाडकरांनी हे सर्वकाही सहन केले. घरोघरी किमान १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाटा साठविण्यास मनमाडकर शिकले. काही दिवसांपूर्वीच शहरासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास पूर्णत्वास आले. शिवाय ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे पालखेड धरणातील जादा पाणी मनमाडकरांना मिळाले. पाटोदा येथील तलावाची साठवणूक क्षमता वाढली.
वाघदर्डी धरणातही काही प्रमाणात पाणी जमा झाले. शिवाय अंतर्गत जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने व पाण्याचा पुरेसा साठा झाल्याने मनमाडकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेकडून होऊ लागला.
शहराला आठ दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने जाहीर केले होते. परंतु कोणत्या भागात कधी पाणी येईल याचे वेळापत्रक निश्चित नसल्याने अचानक कधीही पाणी पुरवठा सुरू होऊन मनमाडकरांची तारांबळ उडत आहे. शिवाय मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. हा पाणीपुरवठा अनेक भागात एक तासाऐवजी अडीच ते तीन तास सुरू असतो. तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना आता पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा हे चांगलेच उमगू लागले आहे. पालिकेने नियोजनानुसार एक ते दीड तास पाणी सोडावे, व्यवस्थित वेळापत्रक आखावे अशी मागणी होऊ लागली आहे.
अनियमीत पाणीपुरवठा : मनमाडकरांचे पाण्यासाठी जागरण, झोपेचे खोबरे
अनेक महिने महिन्यातून फक्त एक दिवस नळाव्दारे पाणीपुरवठा होत असल्याचे दृश्य डोळ्यांमध्ये साठविणाऱ्या मनमाडकरांना अलीकडेच काही दिवसांपासून सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे पाहावयास मिळू लागले.
First published on: 17-09-2014 at 08:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irregular water supply in manmad