नगरपरिषदेकडून नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यास होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे येथील आठवडी बाजार व परिसरात घाण व दरुगधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आठवडी बाजार की कचरा डेपो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आठवडी बाजारातून लाखो रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या नगरपरिषदेला त्याबद्दल सोयरसुतक नाही. बाजाराच्या या दैन्यावस्थेबद्दल नगरप्रशासनाला पाठीशी घालण्याचाच प्रकार जिल्हा प्रशासन करीत आहे.
येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. रविवारी शहरातील स्टेट बॅंक चौक, जनता चौक, मुख्य बाजारपेठ, मलकापूर रोडवर भाजीबाजार, कपडाबाजार, फळांची दुकाने, यासह इतर गृहोपयोगी साहित्याची हजारो दुकाने थाटली जातात. त्यांच्याकडून प्रती दुकान दहा रुपयेप्रमाणे लाखो रुपये उत्पन्न मिळविले जाते. मात्र, त्या ठिकाणची साफसफाई करण्यास नगरपरिषद टाळाटाळ करीत आहे.
भाजीबाजारात कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पालिका दुकान संकुलात शहरातील कचऱ्यांचे ढीगच्या ढीग तयार होतात. आठवडी बाजारात सगळीकडेच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या साम्राज्यातच बुलढाणेकरांना बाजारहाट करावा लागतो.
सात वर्षांपूर्वी आठवडी बाजारात व्यापारी व भाजीमंडीसाठी नगर पालिकेने दोन मजली दुकान संकुलाची इमारत बांधली. या संकुलाचा लिलाव करण्यापूर्वीच तेथे शहरातील कचऱ्याचा अनधिकृत डेपो आणि मोकाट जनावरांचाही सुळसुळाट निर्माण झाला आहे. याकडे परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने लक्ष देऊन या संकुलात किमान आठवडय़ातून एकदा स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. १९९३ साली भाजपचे तत्कालीन नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांनी आठवडी बाजारात पहिल्यांदा भाजीपाला विक्रेत्यांसाठी सिमेंट ओटय़ांची व दुकान गाळ्यांची बांधणी केली. सोबतच परिसरात सुटसुटीत रस्ते तयार केले. त्यांच्यासह नगराध्यक्ष पी.पी.कोठारी, केशवराव एकबोटे यांनी आठवडी बाजार स्वच्छतेला प्राधान्य दिले. मात्र, सध्याचे सत्ताधारी आठवडी बाजाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
आठवडी बाजारातील कचऱ्याचे वाढते ढीग, धान्य व भाजीबाजारातील अस्वच्छता, जनावरे व डुकरांचा सुळसुळाट, सांडपाणी व डबक्यांचे साम्राज्य हे नित्याचेच झाले आहे. आठवडी बाजारात प्रसाधनगृहांची सुध्दा मारामार आहे. स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून स्वच्छता व पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. नगर परिषदेने लक्ष घालून ही अव्यवस्था दूर करावी अन्यथा, नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आठवडी बाजारातील धान्य व भाजीपाला विक्रेत्यांनी दिला आहे.
..हा आठवडी बाजार की कचरा डेपो?व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नगरपरिषदेकडून नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यास होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे येथील आठवडी बाजार व परिसरात घाण व दरुगधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आठवडी बाजार की कचरा डेपो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आठवडी बाजारातून लाखो रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या नगरपरिषदेला त्याबद्दल सोयरसुतक नाही. बाजाराच्या या दैन्यावस्थेबद्दल नगरप्रशासनाला पाठीशी घालण्याचाच प्रकार जिल्हा प्रशासन करीत आहे.
आणखी वाचा
First published on: 10-07-2013 at 11:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it a weekly market or garbage dumping ground