अवघ्या काही वर्षांपूर्वी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेला गड विधानसभा निवडणुकीत उद्ध्वस्त झाल्यानंतर राज ठाकरे हे प्रचारात दिलेला आपला शब्द पाळणार की नाही, याकडे शहरवासीयांबरोबर विरोधकांचेही लक्ष आहे. ‘विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये सहा महिने ठाण मांडून विकास काय असतो ते दाखवतो,’ अशी भीम गर्जना राज यांनी जाहीर सभेत केली होती. त्याआधीही राज यांच्या अनेक गर्जना नाशिककरांच्या कानांवर आदळल्या आणि विरल्या. त्यामुळे विधानसभेतील पानिपतानंतर राज हे आपला शब्द पाळतील की नाही, याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेला नाशिकमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार असणारे वसंत गीते मोठय़ा फरकाने पराभूत झाले. नाशिक पश्चिममधील पक्षाचे उमेदवार नितीन भोसले आणि नाशिक पूर्वचे रमेश धोंगडे यांच्यासह अनेकांवर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की ओढवली. लोकसभा निवडणुकीत जे घडले, त्याची पुनरावृत्ती विधानसभेत झाली. मागील विधानसभा निवडणुकीत राज करिष्म्याने एकहाती तीन जागा पटकावणाऱ्या मनसेचे शहरात या वेळी पानिपत झाले. एखाद्या मतदारसंघाचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मनसे कुठे स्पर्धेत असल्याचे जाणवलेच नाही. पाच वर्षांत असे काय घडले की सर्वस्व गमाविण्याची वेळ मनसेवर आली, याची चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू आहे. नाशिक पालिकेत सत्ता असूनही मनसे फार काही करू शकली नाही. या कारभाराबद्दल शहरवासीयांच्या मनात असणारा रोष खुद्द राज यांनाही ज्ञात होता. यामुळे प्रचारात त्यांनी रखडलेल्या विकास कामांबद्दल कारणमीमांसा करण्यावर भर दिला. तत्कालीन आघाडी शासनाने महापालिकेस संपूर्ण वेळ आयुक्त न दिल्याने अनेक कामे रखडल्याचे कारण त्यांनी पुढे केले. इतकेच नव्हे तर, विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने नाशिकमध्ये ठाण मांडून विकास कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. शहराचा विकास कसा असतो ते दाखवितो, असा राणा भीमदेही थाटात त्यांनी केलेले विधान प्रत्यक्षात येईल की नाही याबद्दल शहरवासीयांमध्ये साशंकता आहे.
गतनिवडणुकीत राज यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नाशिककरांनी मनसेला भरभरून मतदान केले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून देत मनसेच्या हाती सत्ता सोपविली. त्यामुळे राज हे नाशिककरांना गृहीत धरत गेले. सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी काहीही केले नाही. उलट ज्या ठिकाणी आपली सत्ता आहे तिथे आंदोलने करण्याची वेळ मनसेवर आल्याचा संदेश सर्वदूर पसरला. विकासकामे होत नसल्याचे खापर शासनावर फोडण्यात आले. प्रदीर्घ काळ एका गटाच्या मनसबदारांना पदांची खिरापत मिळाली. यामुळे दुसरा गट आणि कोणत्याही गटातटात नसलेले दुखावणे स्वाभाविक होते. सत्तासंघर्षांतून अंतर्गत गटबाजीला उधाण आले. यामुळे मुंबईहून खास संपर्कप्रमुखाची नेमणूक करून स्थानिकांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात आली. प्रचारात ज्यांच्यावर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले, सत्ता टिकविण्यासाठी त्यांचे हात हातात घेण्यात त्यांना काहीच वाटले नाही. अव्याहतपणे चाललेल्या या घडामोडींचा परिपाक मनसेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्यात झाला आहे. पालिका निवडणुकीस अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेऊन भाजप, शिवसेना, सध्या तात्पुरते मित्र बनलेले काँग्रेस व राष्ट्रवादी हे सर्व पक्ष पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसणार आहेत. विधानसभेचे निकाल मनसेसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर राज हे आपल्या आश्वासनानुसार नेमका काय विकास करून दाखविणार की नाशिककडे पाठ फिरविणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा