भूमध्य समुद्र, मृत समुद्र, तांबडय़ा समुद्राचा किनारा, बर्फाच्छादित शिखरे, कुठे हिरवी कुरणे तर कुठे ओसाड वाळवंट अशा नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या इस्रायलने अल्पावधीत साधलेल्या प्रगतीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेले कमालीचे कुतूहल, त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न दस्तुरखुद्द इस्रायली शिक्षणतज्ज्ञांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी येथील सरस्वती शाळेत केला.
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीला नव्या सुधारणांची जोड देण्यासाठी राज्य सरकार, इस्रायल उच्चाधिकारी कार्यालय आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी हे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असून त्यासाठी राज्य सरकार आणि इस्रायल यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यातील शिक्षकांसाठी दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात बुधवारपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने इस्रायली शिक्षणतज्ज्ञांच्या चमूने ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेला मंगळवारी सकाळी भेट दिली. इस्रायलचे भारतातील उच्चाधिकारी मतान झमीर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शहाफ गाल, डोव किपरमन आणि ओजस वाल्डमन यांचा समावेश  पाहुण्यांमध्ये होता.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या एक वर्षांनंतर निर्माण झालेल्या इस्रायलने प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात केली. सुरुवातीला कृषी क्षेत्राकडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्यात प्रगती साधल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान आणि जगातील नावीन्यपूर्ण कल्पनांचा पुरेपूर वापर करत विकास साधला. इस्रायलच्या या प्रगतीचा आलेख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मुलांमध्ये कुतूहल वाढते आणि त्यांना शिक्षणाकडे आकर्षित करता येऊ शकते. त्याचबरोबर इस्रायलमध्ये भाषा, विज्ञान, गणित आणि इंग्रजी या चार विषयांवर अधिक भर दिला जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.       
 शिक्षकांशी  संवाद साधणार
 आताच्या विद्यार्थ्यांना चाकोरीबाहेरच्या नावीन्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, फळा, पुस्तके ही पारंपरिक शिक्षणपद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच यशस्वी उद्योजकांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कसा उपयोग करायचा, हे इस्रायलचे शिक्षणतज्ज्ञ राज्यातील शिक्षकांना परिषदेत सांगणार आहेत. इस्रालयमधील तंत्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लम्बर यांसारख्या विषयांबरोबरच सोलर एनर्जी, नॅनो टेक्नॉलॉजी शिकवली जाते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही हे विषय शिकविता येतील, हा याचा ऊहापोह या परिषदेत होणार आहे.

Story img Loader