पनवेलची ओळख भाताचे कोठार ते तलावांचे गांव अशी आहे. तसेच येथील जपलेली विविध धर्माची मोट असेही पनवेलचे एक रूप आहे. १०० वर्षांपूर्वीची इस्रायल कबरस्थान हे त्याचेच एक प्रतीक आहे. कालांतराने पनवेलची लोकवस्ती वाढली. इस्रायल तलावाशेजारील कबरस्थान आता काळाच्या पडदय़ामागे लुप्त होत चालले आहे. अजून काही वर्षांनी या कबरस्थानाकडे दुर्लक्ष झाल्यास या कबरस्थानची शोध मोहीम पनवेल नगरपालिकेला हाती घेण्याची वेळ येईल.
इस्रायल तलावाशेजारी सुरुवातीला चार ते पाच कुटुंबे राहत असल्याची माहिती येथील रहिवासी अब्बास पठाण यांनी दिली.
पठाण यांच्या मते त्या वेळी इस्रायल तलावापेक्षा कबरस्थान हे या ठिकाणची एक ओळख होती. मात्र येथील लोकवस्तीपाठोपाठ येथे राहणीमानापोटी घरे वाढली. सुरुवातीला चार घरे असणाऱ्या या ठिकाणी आज १०० हून अधिक कुटुंबे राहतात. आजही तलावाशेजारी असणाऱ्या कबरींचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे स्नेही येथे येतात. मात्र तलाव आणि कबरस्थानातील अंतर कमी झाल्याने या कबरी रस्त्याच्या मधोमध आल्याचा भास येथे नवीन येणाऱ्यांना होतो.
अनेकांनी कबरींना खेटूनच घरे बांधली आहेत. कबरी घरांशेजारी ठेवल्या आहेत की, घरे कबरींच्या शेजारी बांधली आहेत, अशी द्विधा येथे होते.
आजही पनवेलच्या टपालनाक्यांवर काही इस्रायल नागरिक पनवेलकर म्हणूनच राहतात. त्यांच्या कबरस्थानाची मुस्कटदाबी हे पनवेल नगरपालिकेच्या दीडशे वर्षांच्या रुबाबाला अशोभनीय आहे. किमान या कबरस्थानाचा श्वास मोकळा करून, तेथील सुशोभीकरण केल्यास यापुढील तरी अतिक्रमणावर पालिकेचा अंकुश ठेवता येईल, अशी माफक अपेक्षा येथे येणारे इस्रायल नागरिक करीत आहेत.  

Story img Loader